Jammu Kashmir Army accident News: जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्हात भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात लष्कराचे एक वाहन एक खोल दरीत कोसळले आहे. दरीत कोसळलेल्या वाहनात २० जवान होते. त्यातील १० जवानांचा मृत्यू झाला आहे. तर तेवढेच जवान जखमी झाले असल्याची माहिती उपराज्यपालांच्या कार्यालयाने दिली. हा अपघात गुरूवारी (ता. २२ जानेवारी) रोजी भद्रवाह-चंबा राज्य महामार्गावर झाला.
डोडा जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाताना अपघात
लष्कराचे वाहन डोडा जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जात असताना हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन दरीत कोसळले. अपघातानंतर लगेच स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
“डोडा येथे झालेल्या रस्ते अपघातात आपल्या भारतीय लष्कराच्या १० शूर जवानांचा मृत्यू झाल्याने आम्ही खूप दुःखी आहोत. आमच्या शूर जवानांची उत्कृष्ट सेवा आणि सर्वोच्च बलिदान आम्ही नेहमीच स्मरणात ठेऊ. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना,” असे नायब राज्यपालांच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
२०० फूट खोल दरीत कोसळले लष्करी वाहन
अपघातात जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने १० जवान ठार झाले आणि नऊ जण जखमी झाले. हा अपघात भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय रस्त्यावरील खन्नी टॉप येथे झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० जवानांना घेऊन जाणारे बुलेटप्रूफ लष्करी वाहन एका उंच ठिकाणच्या चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले.
जखमींवर उपचार सुरू
भद्रवाह येथील खन्नी टॉप परिसरात लष्कराच्या वाहनाचा अपघात झाला, ज्यामुळे तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर लगेचच, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि दुर्गम भूभाग व प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमी जवानांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आणि नंतर विशेष वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना उधमपूर येथे विमानाने नेण्यात आले.
