जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात भारताच्या सुरक्षा दलाने एक मोठी कारवाई केली आहे. बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी कमांडर ठार करण्यात यश आलं आहे. बडगाम जिल्ह्यातील युसमार्गच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली होती.
त्यानंतर झालेल्या चकमकीत ‘यासिर’ नावाचा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मारला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी काश्मीरमधील बडगाममध्ये या कमांडरबाबत सुरक्षा दलाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत हा लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मारला गेला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, यासिर हा लष्कर-ए-तैयबाच्या ‘सुलेमान मुसा’ या मोठ्या गटाचा भाग होता. वर्षभरापूर्वी तो या गटापासून वेगळा झाला होता आणि तेव्हापासून तो स्वतंत्रपणे कार्यरत होता. सुरक्षा यंत्रणा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. मागील काही काळापासून युसमार्ग भागात तो असल्याचा संशय होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, यासिर हा या भागात लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख सदस्य म्हणून उदयास आला होता. युसमार्गच्या उंच भागात तो असल्याचा संशय असल्याने सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या जात असतानाच त्याच्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी करवाई करत त्याचा खात्मा केला आहे.
दरम्यान, यासिरच्या मृत्यूनंतर आता तपास यंत्रणा त्याचं नेटवर्क, ‘लष्कर-ए-तैयबा’च्या इतर सदस्यांशी असलेले त्याचे संबंध आणि या भागात त्याच्या कारवायांची व्याप्ती याचा तपास करत आहेत. या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्यानंतर घटनास्थळावरून एके-४७ रायफलसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ठार झालेला हा दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
