श्रीनगर : चिनाब नदीवरील जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पूल आणि अंजी खड्ड पूल यांसारख्या अभियांत्रिकी कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरच्या रेल्वे संपर्काला नवी दिशा मिळाली आहे. काश्मीर खोर्याला देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडणार्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्गामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच नाशवंत पदार्थ व शेतीमाल देशभरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग खुला झाला आहे.
आता सीमावर्ती आणि दुर्गम भागांपर्यंत रेल्वे संपर्क वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे नियोजन असून, गेल्या पाच ते सहा वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली.
श्रीनगर येथील लोकभवनात निवडक माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सिन्हा यांनी रेल्वे, रस्ते, पर्यटन, कृषी, उद्योग आणि जलविद्युत क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. हिमालयातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि सुरक्षाविषयक आव्हानांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दळणवळणाची साधने उभारणे आव्हानात्मक ठरले आहे. मात्र, रेल्वे आणि रस्ते संपर्क सुधारल्याने या प्रदेशातील नागरिकांना देशाच्या अन्य भागांशी जोडण्याबरोबरच व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनातून रोजगारनिर्मितीचा दावा
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या सव्वा कोटीवरून अडीच कोटींपर्यंत वाढल्याचे सिन्हा यांनी सांगितले. सुधारित रेल्वे आणि रस्ते संपर्कासह विमानसेवांमधील वाढीमुळे पर्यटनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. अमरनाथ यात्रा, धार्मिक पर्यटन आणि पर्वतीय पर्यटनासाठीही सुधारित दळणवळण उपयुक्त ठरत आहे. काश्मीर खोर्यात पाच हजारांहून अधिक नवीन हॉटेल आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला.
उद्योग आणि जलविद्युत क्षेत्रावर भर
२०२१ मध्ये लागू करण्यात आलेल्या औद्योगिक धोरणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाल्याचे सिन्हा यांनी सांगितले. गुंतवणुकीसाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला. औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यांमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.
शांतता, सुरक्षा आणि विकासाचा मुद्दा
काश्मीरमधील सुरक्षेची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सिन्हा यांनी केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिकांनी दहशतवादाविरोधात व्यक्त केलेल्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी शांतता आणि विकासासाठी नागरिकांची इच्छा अधोरेखित केली. श्रीनगर व जम्मू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.
