जम्मू-काश्मीर कलम ३७० रद्द करण्यापूर्वी बरेच चांगले होते, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केलंय. तसेच केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच बदल घडवून आणण्याची आश्वासने दिली होती. मात्र त्यापैकी काहीच घडलं नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्राने रोजगार निर्मिती आणि राज्यात सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यापैकी काहीच घडलं नाही, असं नबी यांनी म्हटलंय.

“आम्हाला सांगण्यात आले होते की जम्मू -काश्मीरमधील परिस्थिती ३७० रद्द केल्यानंतर बदल होईल. रुग्णालये आणि इतर सुविधा पुरवल्या जातील. रोजगारनिर्मिती केली जाईल, यापैकी कोणतेच आश्वासन पुर्ण झाले नाही. खरं तर, जेव्हा तिथं मुख्यमंत्र्यांचे राज्य होते तेव्हा आमची परिस्थिती बरीच चांगली होती.  जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचे परिणाम लोकांना जाणवत आहेत. “आम्ही हरलोय. एका राज्याचे दोन भाग झाल्याने आमचं खूप मोठं नुकसान झालंय. राज्यातील विधानसभा बरखास्त झाल्यापासून आमचा मोठा पराभव झाला आहे,”  असं नबी एएनआयशी बोलताना म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शहा शनिवारी सकाळी तीन दिवसांच्या भेटीसाठी जम्मू आणि काश्मीरला पोहोचले. त्या पार्श्वभूमिवर गुलाम नबी आझाद यांनी हे वक्तव्य केलंय. सरकारने दोन वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर गृहमंत्र्यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे.