पीटीआय, श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये पावसाचे प्रमाण जवळपास २६ टक्क्यांनी कमी झाल्याने तेथे पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार २० जिल्ह्यांपैकी केवळ पाचच जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण सामान्य श्रेणीत नोंदवले गेले.
काश्मीर खोऱ्यातील शोपियां आणि जम्मू विभागातील कठुआ या जिल्ह्यांमध्ये भीषण टंचाई जाणवत आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात १ मार्च ते ६ मे २०२६ या कालावधीत सामान्य प्रमाणापेक्षा ७१ टक्के कमी पाऊस पडला आहे. याच कालावधीत कठुआ जिल्ह्यातही सामान्य प्रमाणापेक्षा ६३ टक्के कमी पाऊस झाला आहे. कुलगाम जिल्ह्यात ५३ टक्के पाऊस कमी झाला आहे.
विविध समाजमाध्यमावर हवामान अंदाज व्यक्त करणारे पोर्टल चालवणारे फैजान केंग म्हणाले, जम्मू आणि काश्मीर गंभीर पाणीटंचाईच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथे सरासरी ९९.६ मिमी पावसाची अपेक्षा असताना केवळ ८६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही तूट सरासरीपेक्षा १३ टक्के आहे. दुर्गम भागांत अनेक ठिकाणी नागरिक टंचाईचा सामना करत आहेत. ओढे, नद्यांची पाणीपातळी सरासरीपेक्षा खाली गेली आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
