पीटीआय, श्रीनगर

या जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या पहिल्या जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी हिरवा झेंडा दाखवला. जम्मू-काश्मीरमधील पूंछ, राजौरी आणि उरी यांसारख्या दुर्गम भागांना देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे आश्वासन वैष्णव यांनी यावेळी दिले. यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ली आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून २०२५ रोजी कटारा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या पहिल्या थेट रेल्वेसेवेचे उद्घाटन केले होते.

जम्मू आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल, पर्यावरणाला चालना मिळेल तसेच सर्व ऋतूंमध्ये सुरू राहणारी वाहतूक सेवा उपलब्ध असेल, असे यावेळी सांगण्यात आले. ‘उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक’ (यूएसबीआरएल) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूंछ-राजौरी प्रदेशाला देशाच्या मुख्य रेल्वे जाळ्याला जोडण्यासाठी आणि त्याचा उरीपर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील रेल्वे प्रकल्पांसाठी ४३ हजार ७८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १९९०च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या या प्रकल्पाअंतर्गत काश्मीर खोऱ्यात पहिली रेल्वे ऑक्टोबर २००८मध्ये सुरू झाली.