कोचिंग क्लासवरून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला जमावाने घेराव घातला. या दोघांनाही मारहाण केली आणि त्यानंतर अल्पवयीन तरूणीचे कपडे फाडत तिचा विनयभंग केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी सदर लोकांचा तपास करत या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. हा व्हिडीओ बिहारच्या जमुई जिल्ह्यातला आहे. मात्र व्हिडीओ देशभरात व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबूने या घटनेत जे दोघंजण अडकले होते त्यांचं कौतुक केलं आहे. ज्या धीराने हे दोघं प्रसंगाला सामोरे गेले त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं खुशबूने म्हटलं आहे.

खुशबू पटानी नेमकं काय म्हणाली?

जमुईतल्या घटनेनंतर एक गोष्ट खूप चांगल घडली. आपल्याला या घटनेत दोन प्रकारचे पुरुष काय असतात ते पाहण्यास मिळालं. पुरुषाचा एक प्रकार असा होता जो गमछा घालून मुलींचा विनयभंग करतात, लैंगिक छळ करतात. आम्ही गुंडाराज आहोत हे दाखवून देतात. दुसऱ्या प्रकारचा पुरुष म्हणजे त्या अल्पवयीन मुलीचा मित्र. तुम्ही ती दृश्यं बघा तुम्हाला समजेल एक अशिक्षित, मूर्ख, कोत्या मनोवृत्तीचा पुरुष आणि दुसरा शिकला सवरलेला दहावीत शिकणारा मुलगा. दोघंही बिहारचेच आहेत पण दोघांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यांच्या विचारांमध्ये अंतर दिसून आलं. तो दहावीतला मुलगा आहे, त्याला वाटलं असतं तर पळून जाऊ शकला असता. त्याची स्कुटीही सुरू होती, तो फरार होऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही.

अशी मैत्री नशिबानेच पाहायला मिळते-खुशबू

पुढे खुशबू म्हणाली मुली जेव्हा अशा प्रकारच्या कुठल्या प्रसंगात अडकतात जिथे १३-१४ लोक तिचे लचके तोडायलाच बसले आहेत. तिला वाट्टेल तिथे हात लावत आहेत, तिचा विनयभंग करत आहेत. अशा वेळी त्या मुलीची शुद्ध हरपली असती. ती बोलू शकली नसती. विचार करू शकली नसती. पण तिला जे बोलायचं होतं ते ती बोलत राहिली, सातत्याने बोलत राहिली. आम्हाला माफ करा हे त्यांना सांगत राहिली. लिंचिंग सारख्या घटनांमध्ये हे करणं सुचत नाही. काहीच सुचत नाही. ते दोघंही लहान मुलं आहे. तसंच मी हेदेखील पाहिलं की मुलाला पकडून मारायला नेतात तेव्हा मुलगी मधे पडते आणि त्याला घेऊन येते. मुलीला मारायला नेतात तेव्हा मुलगा मधे पडतो आणि तिला वाचवतो आहे. अशी दोस्ती, अशी नाती सगळ्यांना मिळाली पाहिजेत. त्यांना सलाम आहे.

मला असंही वाटतं की आता आपण हिरो आणि हिरॉईन यांची व्याख्या बदलली पाहिजे. या प्रसंगात टिकून राहणारी मुलं ही खरंच हिरो आहेत. आजच्या पिढीचे हिरो आहेत. इतकी वाईट परिस्थिती होती की मुलीवर बलात्कार झाला असता. त्या मुलाला आणि मुलीला मारून टाकलं असतं. पण हे दोघंही परिस्थितीला सामोरे गेले. भल्या भल्यांना जे जमत नाही ते त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे या मुलांचं सर्वच स्तरातून कौतुक व्हायला हवं असं मला वाटतं असं खुशबू पटानीने म्हटलं आहे.