नवी दिल्ली : आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे पालक आणि कुटुंबीय आपल्या मुलांशी संपर्क होत नसल्यामुळे चिंतेत आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी काहींना रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही मुले नेमके कुठे आहेत, याची कल्पना नसल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
या वर्षी दोन वेळा ‘नीट-यूजी’ परीक्षा दिलेला हर्षित हा २० वर्षीय विद्यार्थी निदर्शनांमध्ये सहभागी झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वायव्य दिल्लीच्या पोलीस ठाण्यात ठेवल्याचा अंदाज आहे. त्याचा भाऊ कार्तिकेयन हर्षितचा शोध घेत आहे. “आम्ही सोमवारी दुपारी १.३० वाजता त्याच्याशी शेवटचे बोललो, त्यानंतर त्याच्याशी संपर्क झाला नाही. आता आम्ही शालिमार बाग पोलीस ठाण्यात जाऊन पाहणार आहोत,” असे कार्तिकेयनने ‘पीटीआय’ला सांगितले.
आणखी एका प्रकरणात अमित उपाध्याय या २६ वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन वायव्य दिल्लीच्या पोलीस ठाण्यात ठेवले आहे. त्याच्या कुटुंबीयांना अद्याप त्याला भेटण्याची परवानगी मिळाली नाही, तसेच त्याला सोडणार की नाही, हेही त्यांना माहीत नाही. अमित दिल्ली विद्यापीठाचा कायदा विषयाचा पदवीधर असून सध्या एलएलएम करत आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, निकालाला विलंब लागणे आणि देशातील शैक्षणिक व्यवस्थेचे वाईट व्यवस्थापन याच्या जोडीला आता आम्हाला कायद्याची लढाई लढावी लागणार आहे, अशी चिंता या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना वाटत आहे.
निदर्शकांविरोधात गुन्हे; दिल्ली पोलिसांकडून चार एफआयआर दाखल
निदर्शनांदरम्यान झालेला हिंसाचार, मोडतोड आणि अन्य हिंसक घटनांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत चार एफआयआर दाखल केल्या असून आणखी दोन एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी निदर्शनांना हिंसक वळण लागून ११८ पोलीस जखमी झाले असून ६० विद्यार्थी पोलिसांच्या लाठीमारात आणि अश्रुधूरामुळे जखमी झाले.
निदर्शकांविरोधात कायदेशीर आदेशांचे उल्लंघन, लोकसेवकांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखणे, लोकसेवकाविरुद्ध हल्ला किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या बळाचा वापर, बेकायदेशीर जमाव, दंगल, हिंसाचार, सामायिक उद्देश आणि गुन्हेगारी कट रचणे असे विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. संसद मार्ग, कॅनॉट प्लेस आणि अन्य पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे नोंदवले गेले असून निदर्शकांविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्रे कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा या कायद्यांच्या तरतुदीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
कॅनॉट प्लेस येथील रिगल चित्रपटगृहाजवळील पोलीस ठाण्यात हिंसाचार आणि दगडफेक प्रकरणी एक एफआयआर नोंदवण्यात आली आहे. त्याबरोबरच बेकायदा जमाव, संसदेचे अधिवेशन सुरू असताना अनधिकृतपणे ड्रोन उडवणे आणि हिंसाचाराविरोधातील कथित कारस्थान या आरोपांशी संबंधित गुन्हे नोंदवले जात आहेत. कायदा हातात घेणे आणि अन्य संबंधित गुन्ह्यांबाबतही एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘नड्डांच्या घरी प्रतिनिधी नजरकैदेत’; सरकारने वेळ वाया घालवला, ‘सीजेपी’च्या दिपके यांचा आरोप
कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) प्रतिनिधींना सोमवारी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करत, केंद्र सरकारच्या चर्चा करण्याच्या हेतूबद्दल ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शंका व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी एकीकडे आमच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रण दिले आणि दुसरीकडे निदर्शकांवर पोलीस कारवाई केली, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
निदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी जंतर-मंतर पुन्हा एकदा निदर्शकांनी भरून गेले. तिथे समर्थकांसमोर भाषण करताना दिपके म्हणाले, “सरकारने आमचा वेळ वाया घालवला. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केले. त्यांनी त्यांचे मोबाइल ताब्यात घेतले. आशुतोष रांका आणि सौरव दास हे एक प्रकारे जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी नजरकैदेत होते.” आमच्या गटाला विस्कळीत करणे ही त्यांची योजना होती, जेणेकरून गोंधळ निर्माण होईल, आंदोलनासाठी कोणीही नसेल. त्यामुळे त्यांनी दास आणि रांका यांना पाच तास बसवून ठेवले आणि आमचा वेळ वाया घालवला. तुम्ही एका बाजूला चर्चेचे आवाहन करता आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीमार करता, असा आरोप अभिजीत यांनी केला. दरम्यान, दिपके यांच्या आरोपांना केंद्र सरकारने उत्तर दिले नाही.
कलाकारांचा निदर्शकांना वाढता पाठिंबा
दिल्ली पोलिसांनी ‘सीजेपी’च्या निदर्शकांवर केलेल्या अमानुष लाठीमारावर टीका करत अनेक कलाकारांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊ केला आहे. शबाना आझमी आणि प्रकाश राज हे कलाकार सोमवारच्या मोर्चात सहभागी झाले होते. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही ट्विट करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला. “विद्यार्थी आपल्या लोकशाहीची नस आहेत आणि आपल्या देशाच्या भविष्याचे खरे विधाते आहेत. त्यांचा आवाज स्पष्टपणे आणि कोणत्याही भीतीविना ऐकला गेला पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये व्यक्त केली.
अभिनेता-गायक दिलजित दोसांज, अभिनेता-विनोदवीर वीर दास, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांनीही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला. ‘२० जुलैने देशाचा प्रेमभंग केला आहे,’ असे सोनाक्षी सिन्हा म्हणाली. ‘निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करता कामा नये, त्यांना प्रेमाने आलिंगन देण्याची गरज आहे,’ असे अभिनेता सोनू सूद याने म्हटले आहे. निदर्शकांच्या प्रत्येक मुद्द्याशी आपण सहमत नाही, पण विद्यार्थ्यांविरुद्ध हिंसा करणे हे त्यावर उत्तर नाही, अशी भावना अभिनेत्री भूमी पेडणेकरने व्यक्त केली. सोहा अली खानने विद्यार्थ्यांच्या धाडसाची प्रशंसा केली. आदिती राव हैदरी, सिद्धार्थ, पूजा भट्ट, यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
गणवेश परिधान करण्यासाठी एखाद्याला आपला आत्मा आणि विवेकबुद्धी यांच्याशी तडजोड करावी लागते, हे मला माहीत नव्हते. हा आदेश चुकीचा आहे त्यामुळे मी त्याचे पालन करणार नाही, असे म्हणणारा एकतरी पोलीस या देशात आहे का? – अनुराग कश्यप, निर्माता-दिग्दर्शक
विद्यार्थ्यांना अशी वागणूक द्यायला नको होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्या अशी विनंती मी अधिकाऱ्यांना करतो. मला अनेक वेळा देशद्रोही म्हटले गेले आहे. – दिलजित दोसांज, अभिनेता-गायक
जर तुम्ही लाइव्ह कार्यक्रम करणारे भारतीय कलाकार असाल तर लोकांसाठी न बोलणे आणि नंतर त्यांनाच आपल्याच कार्यक्रमाची तिकिटे विकणे हा दांभिकपणा आहे, हे तुम्हाला समजत असेल. – वीर दास, अभिनेता-विनोदवीर
