आंदोलन करायला दिल्लीच्या जंतर-मंतरवर पोहोचायचंय, पण वाटेत पोलिसांचे बॅरिकेड्स, अचानक होणारा लाठीचार्ज, बंद पडलेलं इंटरनेट अन् ‘गोदी मीडिया’चा कॅमेरा! ऐकून एखाद्या खऱ्याखुऱ्या आंदोलनाचा प्रसंग वाटतोय ना? पण हा प्रसंग कोणत्याही रस्त्यावरचा नसून एका नव्याने लाँच झालेल्या भन्नाट ‘व्हिडीओ गेम’मधला आहे. दिल्लीतील ‘जंतर मंतर’ आंदोलनाच्या बातम्या पाहिल्यानंतर, एका २७ वर्षीय तरुणाने हा अनोखा गेम तयार केला आहे. ‘जंतर मंतर चलो’ असं या गेमचं नाव असून, सध्या सोशल मीडियावर या गेमची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘द प्रिंट’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

गोलगप्पे खाऊन शक्ती वाढवा, ‘गमछा’ बांधून सीसीटीव्हीला टाळा! गेममध्ये नेमकं काय?

या गेममधील गमतीदार गोष्ट म्हणजे खेळाडूंना दिल्लीतील आंदोलनादरम्यान येणाऱ्या वास्तविक अडचणींचा सामना गेमच्या माध्यमातून करावा लागतो. गेममध्ये चालून थकल्यानंतर रस्त्यावरील ‘गोलगप्प्यांची प्लेट’ खेळाडूंचा स्टॅमिना वाढवते. तसंच, पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी चेहऱ्याला ‘गमछा’ (रुमाल) बांधण्याचा पर्याय दिला आहे.

आंदोलकांचा ताफा पुढे जात असताना वाटेत जर ‘गोदी मीडिया’चे पत्रकार भेटले, तर ताफ्यातील काही आंदोलकांचं ‘ब्रेन वॉश’ होतं आणि ते आंदोलन सोडून निघून जातात! मात्र, ‘मुक्त पत्रकार’ भेटल्यास आंदोलकांच्या संख्येत भर पडते. आंदोलनादरम्यान विश्रांतीसाठी किंवा बचावासाठी ‘गुरुद्वारा’ हा सुरक्षित आधार दाखवण्यात आला आहे.

‘जंतर-मंतर चलो’ गेम कसा खेळायचा?

या गेममध्ये खेळाडूंना दोन पर्याय मिळतात: ‘आंदोलक’ किंवा ‘दिल्ली पोलीस’

  1. आंदोलकाची भूमिका: जर तुम्ही आंदोलक बनलात, तर रस्त्याने जाणाऱ्या लोकांवर क्लिक करून स्वतःचा गट वाढवायचा असतो. बॅरिकेड्स तोडून जंतर-मंतरवर पोहोचणं आणि तिथे दीर्घकाळ धरणे आंदोलन करणं हे खेळाडूचं मुख्य उद्दिष्ट असतं.
  2. दिल्ली पोलिसांची भूमिका: जर तुम्ही पोलिसांची भूमिका निवडली, तर आंदोलकांना जंतर-मंतरवर पोहोचण्यापासून रोखावं लागतं. यासाठी लाठीचार्ज, अश्रूधूर सोडणे आणि आंदोलकांना बसमध्ये भरून ताब्यात घेणे असे पर्याय वापरले जातात.

गेम खेळताना मध्येच ‘मेट्रो स्टेशनचे दरवाजे बंद झाले आहेत’ किंवा ‘इंटरनेट सेवा खंडित झाली आहे’ अशा अचानक येणाऱ्या सूचना खेळाडूंची उत्कंठा वाढवतात. पोलिसांनी ताब्यात घेतल्यास खेळाडूंना थेट नरेला किंवा कापसहेडा सीमेवर नेऊन सोडलं जातं, तिथून त्यांना पुन्हा जंतर-मंतरचा मार्ग शोधावा लागतो.

बरेलीच्या आयटी अभियंत्याची संकल्पना

उत्तर प्रदेशातील बरेली येथील सूरज कुशवाह या इंजिनियरने हा गेम तयार केला आहे. ‘bugswriter’ या इन्स्टाग्राम आयडीने प्रसिद्ध असलेल्या सूरजने केवळ दोन रात्री जागून या गेमची कोडिंग आणि डिझायनिंग केली.

“मी बातम्यांमध्ये आंदोलनाच्या अनेक घडामोडी पाहत होतो. लोक वेगवेगळ्या मार्गाने जंतर-मंतरवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मला यात एक ‘डार्क ह्युमर’ (व्यंग्यात्मक विनोद) दिसला आणि यावर गेम बनवण्याची कल्पना सुचली,” अशी प्रतिक्रिया सूरजने दिली.

सूरजने गेमच्या डिझायनिंगसाठी एआई (AI) टूल्सची मदत घेतली आहे. ‘द प्रिंट’शी बोलताना त्याने सांगितलं की, सध्या या गेमवर १५०० हून अधिक खेळाडू एकाच वेळी लाईव्ह खेळत आहेत.

मिश्कील टीका अन् नव्या अपडेटची तयारी

गेमच्या स्क्रीनवर खाली चालणाऱ्या न्यूज टिकरमध्ये देशातील सध्याच्या परिस्थितीवर मजेशीर आणि बोचरी टीका करण्यात आली आहे. उदाहरणार्थ — “अश्रूधुराच्या नळकांड्याची मुदत संपल्याने आंदोलकांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली” किंवा “पेपर लीक प्रकरणाच्या चौकशीचा अहवालही लीक!” अशा ओळी स्क्रीनवर स्क्रोल होतात.

गेम राजकीयदृष्ट्या तटस्थ असल्याचा दावा सूरजने केला आहे. सध्या या गेमला मिळालेला प्रतिसाद पाहून तो आता यात नवे अपडेट्स आणण्याच्या तयारी आहे. आगामी अपडेटमध्ये जर आंदोलकांचा ताफा खूप मोठा झाला, तर ते पोलिसांची व्हॅन ताब्यात घेऊन आपल्या अटकेतील मित्रांची सोडवणूक करू शकतील, असा रंजक पर्याय जोडला जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर या गेमची तुफान चर्चा सुरू असून नेटिझन्स हा गेम खेळण्याचा आनंद घेत आहेत.