नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील ‘जंतर-मंतर २.०’ आंदोलनाची गळचेपी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी रविवारी दुसर्या दिवशीही सुरू ठेवला. प्रामुख्याने कॅनॉट प्लेस (सीपी) परिसरात हजारो तरुण आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (एआयएसए) अध्यक्ष नेहा बोरा यांनी पोलिसांना चकवा देत थेट सीपी गाठले. त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची धावपळ उडाली. शांततेत आंदोलन करणार्यांना ताब्यात घेऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही रविवारी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचा काँग्रेससह विरोधी पक्ष, कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी), डावे पक्ष आणि अन्य संघटनांनी तीव्र निषेध केला.
दिल्लीच्या विविध भागांत शनिवारी सात हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतरही रविवारी आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली. कॅनॉट प्लेस हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले होते. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, एआयएसए आणि अन्य डाव्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सकाळपासूनच सीपी परिसरात मोठ्या संख्येने जमले होते. ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’, अशा घोषणा देत आंदोलकांनी जंतर-मंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बॅरिकेड लावून त्यांना रोखले. त्यानंतर अनेक आंदोलकांना ओढत नेऊन पोलीस बसमध्ये बसविण्यात आले.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. या संघटनेचे अध्यक्ष आदर्श साजी यांच्या कपाळातून रक्त येत असल्याची चित्रफीतही एसएफआयने प्रसारित केली. ‘जंतर-मंतर २.०’ सुरू झाले आहे. आम्ही रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावरच राहणार, असे एसएफआयच्या नेत्या आइशी घोष यांनी सांगितले.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास यांना रविवारी सोडण्यात आले. त्यानंतर सीजेपीचे आंदोलकही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध
पोलिसांनी भ्रमणध्वनी हिसकावून घेतल्याचा आणि पोलीस वाहनांमध्ये मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महिला आंदोलकांशी पुरुष पोलिसांनी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांवरील हिंसाचार तातडीने थांबवावा, अशी मागणी एआयएसएने केली. दिल्लीमध्ये दडपशाहीची अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) महासचिव डी. राजा यांनी केली.
नेहा बोरा यांचा पोलिसांना पुन्हा चकवा
जंतर-मंतरकडे जाणारे मार्ग बंद असल्याने आंदोलनाचे केंद्र एकाच ठिकाणी न ठेवता दिल्लीच्या विविध भागांत लहान गटांमध्ये निदर्शने करण्याची रणनीती रविवारीही अवलंबण्यात आली. एआयएसएच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांनी दुपारी अडीच वाजता आर. के. आश्रम परिसरातून आंदोलन सुरू होईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांनीही तातडीने कुमक बोलावून बंदोबस्त वाढविला. तेथील आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले; मात्र नेहा बोरा आर. के. आश्रम परिसरात पोहोचल्याच नाहीत. पोलिसांना चकवा देऊन त्या थेट कॅनॉट प्लेसमध्ये गेल्या.
पोलीस कारवाईवेळी खासदाराला दुखापत
कॅनॉट प्लेस परिसरात पत्रकारांशी बोलत असताना ‘माकप’चे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनाही पोलिसांनी ओढत नेऊन ताब्यात घेतले. ब्रिटास यांनी पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप केला. पोलीस कारवाईत त्यांना दुखापत झाल्याने राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पत्रकारांनाही डांबण्यात आल्याचा आरोप
सलग दुसर्या दिवशी पोलिसांनी पत्रकारांनाही जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचे दिसून आले. अधिकृत ओळखपत्रे दाखवूनही काही पत्रकारांना ताब्यात घेऊन बसगाड्यांमध्ये डांबण्यात आले. शनिवारीही काही पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या वागणुकीबद्दल पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
भाजपची टीका
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन सुरू करणार्या सीजेपीने आता निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांकडे मोर्चा वळवला, अशी टीका भाजप राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केली. ‘अणुकिरणोत्सर्ग क्षयाच्या प्रक्रियेतही इतका झपाट्याने बदल दिसणार नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.
संयुक्त राष्ट्राच्या टीकेला भारताचे प्रत्युत्तर
हजारो आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने व्यक्त केलेली चिंता भारताने फेटाळली. ही टिप्पणी अनाठायी असून भारताच्या अंतर्गत कारभारातील अस्वीकारार्ह हस्तक्षेप असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. आंदोलन करण्याच्या अधिकाराचा पूर्ण आदर राखण्याचे आवाहन या कार्यालयाने केले होते. मानवाधिकार कार्यालय भूमिका घेताना निवडक दृष्टिकोन ठेवत आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये आंदोलनांवर झालेल्या हिंसक कारवाईबाबत या कार्यालयाने भाष्य केलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
अपहरण झाल्याचा ध्रुव राठीचा आरोप
यूट्यूबर ध्रुव राठी यांनी साध्या वेशातील २० जणांनी आपल्या घरात प्रवेश करून आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप केला. सुमारे २२ ते २३ तास वकिलाशी बोलण्याची परवानगी मिळाली नाही. मला ताब्यात घेतले नव्हते, तर माझे अपहरण केले होते,’ असा दावा त्यांनी केला.
लोकशाही देशात कल्पनाही करता येणार नाही, अशी कृती सरकार करत आहे. पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे वागत आंदोलकांना मारहाण केली. लोकशाहीचा पाया कमकुवत करणार्या ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा. न्यायालयाचा अवमान करणार्यांवर, पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. देशभरात आंदोलनाचा विस्तार होणार असून, लोकशाहीवर विश्वास असलेल्या सर्वांनी या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे.’’ – पिनराई विजयन, माजी मुख्यमंत्री, केरळ
दिल्ली पोलिसांनी गुरुद्वारा बंगला साहिबच्या पावित्र्याचा भंग केल्याचा प्रकार गंभीर आहे. गणवेशातील पोलिसांनी बूट घालून आणि डोके न झाकता गुरुद्वारात प्रवेश करणे, तसेच तेथील सरायमधून लोकांना बळजबरीने बाहेर काढणे, हे निषेधार्ह आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. या प्रकरणात सहभागी पोलिसांवर कठोर कारवाई करावी आणि ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची तातडीने सुटका करावी. -कुलदीपसिंग धालीवाल, आमदार व ‘आप’चे मुख्य प्रवक्ते
माझा पक्ष आणि मी शांततेच्या मार्गाने होणार्या जनआंदोलनांचे नेहमीच स्वागत करतो. मात्र, दिल्लीत आंदोलनाच्या नावाखाली अराजकता निर्माण करण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. अशा वेळी गैरप्रकार करणार्यांची ओळख पटवून पोलिसांनी वेळीच कारवाई करणे आवश्यक ठरते.’’ -चिराग पासवान, केंद्रीय मंत्री
