Tejas Fighter Jet : राजस्थानमधील जोधपूर येथील हवाई तळावर भारत आणि जपानच्या हवाई दलांचा संयुक्त सराव सुरू आहे. ‘वीर गार्डियन-२०२६’, असं नाव या युद्ध अभ्यासाला दिलं आहे. या सरावादरम्यान, जपानच्या ‘एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स’चे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरीता यांनी भारताच्या स्वदेशी तेजस या विमानाचं उड्डाण केलं आहे.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी या उड्डाणाला जपानचा या विमानांवरील ‘विश्वास’ दर्शवणारं हे उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. अमर प्रीत सिंग यांनी म्हटलं की, “भारतीय लढाऊ विमान उडवण्याचा ताकेहिरो मोरीता यांचा निर्णय देशाच्या स्वदेशी बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवतो.”
“तुम्ही ‘तेजस’मधून केलेलं उड्डाण हे भारतीय बनावटीच्या विमानांवर तुमचा किती विश्वास आहे, याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. मला खात्री आहे की विशेषतः लढाऊ विमानांच्या उड्डाण प्रशिक्षणासह विविध क्षेत्रांतील देवाणघेवाण कार्यक्रमांना चालना देण्यात या उड्डाणाची मोठी भूमिका असेल”, असंही सिंग यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
‘हा सराव भागीदारीतील एक पाऊल’
“मी असं म्हणू शकतो की ‘वीर गार्डियन २०२६’ हा केवळ एक सराव नव्हता. आमच्या भागीदारीतील हे आणखी एक महत्वाचं पाऊल आहे. ही भागीदारी आमच्या प्रत्येक संयुक्त उपक्रमाबरोबर अधिक दृढ होत जात आहे. ही भागीदारी परस्पर शिकण्याच्या संधी, अधिक चांगली परस्पर कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असलेल्या आमच्या हवाई योद्ध्यांमध्ये अधिक घनिष्ठ मैत्री निर्माण करण्याचे नवीन मार्ग खुले करत राहील. दोन्ही हवाई दलांसाठी कोणतीही गोष्ट साध्य करणं अशक्य नाही आणि आम्ही ही भागीदारी अधिक वाढवत राहू”, असं मत एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी व्यक्त केलं.
एका महिन्यानंतर सिंग होणार निवृत्त
“माझ्याबद्दल आणि प्रमुख म्हणून माझ्या कार्यकाळाबद्दल आपण काढलेल्या गौरवोद्गारांबद्दल खूप धन्यवाद. आणखी एका महिन्याने मी या पदावरून निवृत्त होणार आहे. मी तुम्हाला एवढी खात्री देतो की किमान भारतीय हवाई दलात तरी आम्ही ही संस्था कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी असेल, याची काळजी घेतो. त्यामुळे एखादी व्यक्ती निवृत्त झाल्याने काहीही बदलणार नाही. जपानच्या हवाई संरक्षण दलाशी आमचे संबंध असेच कायम राहतील. माझे उत्तराधिकारी याला पुढे नेतील आणि आमचे संबंध अधिक बळकट करतील, असंही अमर प्रीत सिंग यांनी म्हटलं आहे.
