Japan bans Indian mango imports: जपानने २० वर्षांनंतर भारतातून होणारी आंब्याची आयात थांबवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या तपासणीदरम्यान भारतीय प्रक्रिया केंद्रांमधील कीड-नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने जपानने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे उन्हाळ्यातील महत्त्वाच्या आंब्याच्या हंगामात निर्यातीत व्यत्यय आला असून, हापूस, केसर, लंगडा आणि बंगनपल्ली यांसारख्या भारतातील प्रमुख आब्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.
जवळपास २० वर्षांनंतर बंदी
जवळपास दोन दशकांतील ही पहिलीच बंदी आहे. फळमाशीच्या धोक्यामुळे जपानने यापूर्वी भारतीय आंब्यांवर बंदी घातली होती आणि भारताने नियम अधिक कडक केल्यानंतरच २००६ मध्ये ही बंदी उठवली होती. आता, भारतीय आंबे देशाच्या कठोर मानकांचे पालन करत आहेत की नाही? याबद्दल जपानी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. जपानने फळमाशीसारख्या आक्रमक कीटकांविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण अवलंबले आहे.
निर्जंतुकीकरण प्रक्रियेत आढळली त्रुटी
प्रत्येक आंबा निर्यात हंगामापूर्वी, जपान भारताच्या वाफ उष्णता प्रक्रिया केंद्रांची तपासणी करण्यासाठी विलगीकरण अधिकाऱ्यांना पाठवते. निर्यातीपूर्वी आंब्यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी या केंद्रांवर असते. या वर्षी मार्चमध्ये, उत्तर प्रदेशातील रहमानपूर येथील उष्णता प्रक्रिया केंद्रांची केंद्राची तपासणी करण्यात आली. अहवालानुसार, जपानी अधिकाऱ्यांना केंद्रातील निर्जंतुकीकरण प्रक्रियेत त्रुटी आढळल्या होत्या.
उत्पादकांची प्रतिक्रिया
“जपानची बाजारपेठ तितकी मोठी नसली तरी ती खूप महत्त्वाची आहे,” असे उत्तर प्रदेशातील निर्यातदार अक्रम बेग यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले. “देशांतर्गत बाजारपेठही यावर्षी अडचणींचा सामना करत आहे आणि आम्हाला तोटा सहन करावा लागत आहे. प्रत्येक कारखान्यातील आंबे कसे नाकारले जाऊ शकतात?”, असा प्रश्न बेग यांनी उपस्थित केला. दरम्यान, भारत सरकारने या विषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. पण, केंद्र सरकार जपान सरकारसोबत चर्चा करत आहे, अशी माहिती मँगो ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एस. इंसाराम अली यांनी ‘द प्रिंट’ला दिली.
