टोकियो : गेल्या काही दशकांपासून सातत्याने घटणार्या लोकसंख्येचा सामना करणार्या जपानमध्ये एका विशिष्ट वयोगटातील नागरिकांची संख्या मात्र विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. जपानमध्ये पहिल्यांदाच १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे.
या सप्टेंबर महिन्यात शतायुषी नागरिकांची संख्या १०७,६७७ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात जवळपास ८,००० ची वाढ झाली असून, सलग ५६ व्या वर्षी ही संख्या वाढली आहे. शंभरी ओलांडलेल्या नागरिकांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८८ टक्के आहे. सध्या जपानमधील सर्वांत वयोवृद्ध नागरिकांमध्ये ११४ वर्षांच्या फुयो किशिमोटो आणि कुमामोतो येथील ११२ वर्षांचे हिकारू काटो यांचा समावेश आहे.दीर्घायुष्याचे प्रमाण वाढत असले तरी जपानसमोर आर्थिक संकटेनही निर्माण होत आहेत.
दीर्घायुष्याचे गमक
जपानचा समावेश जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेल्या देशांमध्ये होतो. जागतिक बँकेच्या २०२४च्या आकडेवारीनुसार, जपानमधील सरासरी आयुर्मान ८४ वर्षे आहे. अमेरिकेतील सरासरी आयुर्मान ७९ वर्षे आहे.
जपानमधील दीर्घायुष्यामागे सकस आहार आणि प्रगत आरोग्यव्यवस्था ही प्रमुख कारणे असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
शहरांमध्ये दीर्घकाळ काम करण्याची संस्कृती असतानाही नागरिक ‘इकिगाई’ या जीवनदृष्टीचा स्वीकार करतात. जीवनाला अर्थ, मूल्य, आनंद देणार्या गोष्टींशी स्वत:ला जोडून ठेवण्यावर यात भर दिला जातो.
