Japan earthquake April 2026: उत्तर जपानमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या भागात ७.४ रिश्टर स्केलचा हादरा जाणवल्याची माहिती समोर आली आहे. जपानच्या हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, तीन मीटर उंच (१० फूट) लाटांची शक्यता वर्तवली आहे.

३१ इंच उंच लाटा

समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की, टोकियोमध्ये अनेक इमारतींना हादरा बसला असून, कत्येक किलोमीटर लांब याचा प्रभाव दिसून आला. भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर सुमारे ४० मिनिटांनी ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंच लाटा इवाटे येथील कुजी बंदराला धडकल्या, अशी माहिती जपान हवामान विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. यानंतर प्रशासनाने किनाऱ्या जवळील नागरिकांना या ठिकाणावरुन लांब जाण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांना सूचना

किनारी भागातील नागरिक आणि नदीजवळील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. जमिनीवरुन उंच असणाऱ्या आणि बचावकार्य करण्यास सोपे असणाऱ्या ठिकाणी नागरिकांना आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्सुनामीच्या उंच लाटांमुळे नुकसानाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्सुनामीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणे सोडू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

त्सुनामीची भीती

दरम्यान, आत्ताच्या त्सुनामीच्या फटक्यांमुळे झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, त्सुनामीचा जोर वाढण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाने बचाव पथकांना सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या भागात अधिक नुकसान होण्याची भीती आहे? अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्यास प्रशासनाने बजावले आहे. भूकंप प्रवण भाग असल्याने जपानमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भूकंपाचे धक्के जाणवतात.

२०११ सालची त्सुनामी

२०११ साली जपानमध्ये ९.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांमध्ये १८,५०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय फुकूशिमा आण्विक केंद्राजवळ मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दरम्यान, आत्ता जाणवलेल्या भूकंपाच्या धकक्यांमुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली असून, पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांना सुरक्षित ठिकाण न सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.