एपी, टोक्यो
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकायची यांच्या ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ला (एलडीपी) अपेक्षेप्रमाणे संसदेत पूर्ण बहुमत मिळाले. जपानला अधिक समृद्ध आणि मजबूत करू, अशी प्रतिक्रिया ताकायचीयांनी विजयानंतर दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताकायची यांचे विजयानिमित्त अभिनंदन केले आहे. ताकायची यांच्या ‘एलडीपी’ला सोमवारी सकाळपर्यंत ४६५ पैकी ३१६ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी २६१ जागांचा टप्पा या पक्षाने केव्हाच पार केला असून, जपानच्या राजकारणात आमूलाग्र बदल होण्याचे संकेत दिले जात आहेत. ताकायची यांच्या पक्षाचे १९५५ नंतरचे हे सर्वांत मोठे यश आहे. त्यांनी आघाडी केलेल्या ‘जपान इनोव्हेशन पार्टी’ला ३६ जागा मिळाल्या असून, त्यांच्याकडे आता एकूण ३५२ जागा आहेत.
जपानच्या संसदेत वरिष्ठ सभागृहात ताकायची यांना बहुमत नाही. मात्र, आता कनिष्ठ सभागृहात मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर जपानच्या आर्थिक, लष्करी धोरणांमध्ये तकाईची यांना बदल करता येण्याची शक्यता आहे. चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपान हे धोरणात्मक बदल करण्याची शक्यता आहे. विरोधकांनाही बरोबर घेण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. ताकायची यांनी जपानच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या धोरणात बदल करून लष्करी क्षमता वाढविण्याच्या दिशेने पावले उचलण्याची ग्वाही दिली आहे. शस्त्रनिर्यातीवरील बंदी उठवून या बाबतीतील दीर्घ काळापासूनचे जपानचे धोरण बदलण्याची शक्यता आहे.
‘बदललेल्या विचारधारेचे प्रतिबिंब’
बीजिंग : ‘जपानमध्ये तकाईची यांचा विजय हा तेथील खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे आणि बदललेल्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे,’ अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे. चीनची आक्रमकता लक्षात घेऊन जपानची पुढील धोरणे त्यांच्याविरोधात असण्याची शक्यता पाहता चीनच्या प्रतिक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन यांनी ही प्रतिक्रिया दिली. तकाईची यांचे तैवानबद्दलचे विधान आणि संभाव्य लष्करी धोरणांबाबत विचारले असता जिआन यांनी सांगितले, की चीनने दुसऱ्या देशांच्या अंतर्गत कारभारात कधीही हस्तक्षेप केलेला नाही.
