Japan Illegal Pakistan Mosque: पाकिस्तानने जपानमध्ये बांधलेल्या मशिदीवरुन वाद सुरु झाला आहे. जपानमधील स्थानिक प्रशासनाने मशीद बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. सैतामा प्रांतातील कावागोए येथे असलेली ही मशीद, डोंगराळ वनजमीन म्हणून वर्गीकृत केलेल्या ४५०० चौरस मीटरच्या भूखंडावर बांधण्यात आली असून, स्थानिक प्रशासनाने यावर आक्षेप घेतला आहे.
मिशिदीचे बांधकाम अवैध
कावागोए येथील हे स्थळ शहरीकरण नियंत्रण क्षेत्रात येते, इथं स्थानिक अधिकाऱ्यांकडून विशेष परवानगी मिळाल्याशिवाय बांधकाम करता येत नाही. आसाही शिंबुनच्या एका अहवालानुसार, मालमत्तेच्या नोंदींवरून असे दिसून येते की मार्च २०२५ मध्ये या जमिनीची मालकी बदलली, आणि ती फुजिमी-स्थित एका रिअल इस्टेट कंपनीकडून कावागोए पत्त्यावर नोंदणीकृत असलेल्या एका फर्मकडे हस्तांतरित झाली. कावागोए शहर प्रशासनाने मात्र मशिदीचे बांधकाम अवैध असल्याचे म्हटले आहे.
स्थानिक प्रशासनाचा आक्षेप
“मशीद शहरी विकास नियंत्रण क्षेत्रात बांधण्यात आली आहे, जिथे शहर नियोजन कायद्यांतर्गत विशिष्ट परवानगी घेतल्याशिवाय बांधकामास मनाई असते,” असे स्थानिक प्रशासनाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मशिदीच्या उद्घाटनाला जपानमधील पाकिस्तानचे राजदूत अब्दुल हमीद यांनी हजेरी लावल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. याशियो मशिदीची देखभाल करणारे ६२ वर्षीय पाकिस्तानी नागरिक शकील शेख मोहम्मद यांनी कावागोए प्रशासनावर टीका केली.
पाकिस्तानकडून स्पष्टीकरण
जपानी अधिकाऱ्यांनी मशीद बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जपानमधील पाकिस्तानच्या दूतावासाने कावागोए येथील मशिदीपासून स्वतःला दूर केले आहे. स्थानिक कायद्याचे पालन न करता उभारण्यात आलेल्या या मशिदीचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. परवानगी घेऊनच मशीद बांधल्याची खात्री मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या राजदूतांनी उद्घाटनाला हजेरी लावल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. समाजाच्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाबरोबर सहकार्य करण्याचे आवाहन पाकिस्तानकडून करण्यात आले आहे.
मिशिदीचे पाडकाम होण्याची शक्यता
कावागोए प्रशासन या प्रकरणाचा तपास करुन पुढील निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांशी चर्चा करुन मशिदीबाबत कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी राजदूतांनी उद्घाटन केलेल्या बेकायदेशीर मशिदीचे पाडकाम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
