रस्ते, रेल्वे किंवा इमारतींच्या प्रकल्पांमुळे अनेक देशांमध्ये जुनी झाडे तोडली जातात. मात्र, जपानमध्ये शेकडो वर्षे जुनी आणि महत्वची झाडे तोडण्याऐवजी त्यांचे स्थलांतर केले जाते. यासाठी वृक्षतज्ज्ञ अनेक महिने, तर काहीवेळा वर्षभराहून अधिक काळ झाडांच्या मुळांची विशेष तयारी करतात. ही पारंपरिक पद्धत नेमावाशी म्हणून ओळखली जाते.
प्रत्येक झाडाचे स्थलांतर होत नाही
जपानमध्ये सर्वच झाडे स्तलांतरित होत नाही. ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या झाडांचेच स्थलांतर केले जाते. अशी झाडे प्रामुख्याने मंदिरे, देवस्थाने, पारंपरिक बागा, उद्याने आणि ऐतिहासिक परिसरात आढळतात. विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.
नेमावाशी म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे?
जपानमध्ये मुळांची तयारी करण्याच्या प्रक्रियेला नेमावाशी असे म्हणतात. मूळची बागकामाशी संबंधित असलेली नेमावाशी ही व्याख्या आता जपानी व्यापार आणि राजकारणात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. याचा अर्थ मोठे बदल घडवण्यापूर्वी शांतपणे पूर्वतयारी करणे असा होतो.
या झाडांचे स्थलांतर कसे होते?
मुळांची तयारी पूर्ण झाल्यानंतर झाडाभोवती खोदकाम केले जाते. संपूर्ण मुळे एकाच वेळी उपटून काढण्याऐवजी ते झाडाच्या भोवतालची निवडक मुळे हळूहळू छाटतात. आकार आणि प्रजातीनुसार या तयारीसाठी सहा महिन्यांपासून ते एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यानंतर क्रेन, हायड्रॉलिक यंत्रणा किंवा विशेष वाहने वापरून झाड नवीन ठिकाणी नेले जाते. तिथे आधीच तयार केलेल्या खड्ड्यात ते लावून आधार दिला जातो आणि नियमित पाणी व देखभाल केली जाते.
हे झाडे कशी हलवली जातात ?
मुळांची रचना एकदा तयार झाली की स्थलांतराची प्रक्रिया सुरू होते. तयार केलेला मुळांचा गोळा सुरक्षित राखण्यासाठी कामगार झाडाभोवती खोदकाम करतात. मुळांना तागाच्या कापडासारख्या वस्तूने गुंडाळले जाते. तसेच प्रवासादरम्यान झाडाच्या खोड आणि फांद्यांनाही बांधले जाते.
प्रत्येक झाड जगतेच असे नाही
अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतरही प्रत्येक स्थलांतरित झाड जिवंत राहील याची खात्री नसते. झाडाची जात, वय, आरोग्य, स्थलांतराची वेळ आणि त्यानंतरच्या देखभालीचा दर्जा यांसारख्या घटकांवर ते अवलंबून असते. त्यामुळे अत्यंत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य झाडांसाठीच ही खर्चिक प्रक्रिया केली जाते.
विकास आणि पर्यावरणाचा समतोल
जपानची ही पद्धत विकास आणि पर्यावरण संवर्धन एकत्र साध्य होऊ शकते, हे दाखवून देते. शतकानुशतके उभ्या असलेल्या झाडांना अडथळा न मानता देशाच्या जिवंत वारसाचा भाग म्हणून जपण्याची ही भूमिका मानले जाते.
