जपानमध्ये सगळे यंत्रमानव म्हणजे रोबोट कर्मचारी असलेले हॉटेल जुलैत सुरू होत आहे. या हॉटेलमध्ये चेक इनपासून सगळी कामे व आदरातिथ्य यंत्रमानव करतील. हे यंत्रमानव दिसायला मानवासारखेच असतील.
नागासाकी परफेक्चर येथे हे आधुनिक हॉटेल तयार होत असून, त्यात यंत्रमानव कर्मचारी असतील व त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे हॉटेल चालवण्याचा खर्चही कमी होणार आहे. या हॉटेलचे नाव हेन्ना हॉटेल असे ठेवण्यात येणार असून त्याचा अर्थ विचित्र हॉटेल असा आहे. या हॉटेलमध्ये अक्ट्रॉइड अँड्रॉइड रोबोट असतील ते माणसाप्रमाणेच लोकांचे आगतस्वागत करतील, सामान उचलून खोलीत नेतील, कॉफी बनवतील व हसून तुम्हाला दादही देतील. हे यंत्रमानव जपानी, चिनी, कोरियन व इंग्रजी भाषा बोलतील. हुइस तेन बॉश्च या डच शैलीतील पार्कचा हा प्रकार असेल. या दोनमजली हॉटेलचे उद्घाटन १७ जुलैला होणार आहे. त्यात ७२ खोल्या असतील.
 हमाल यंत्रमानव, स्वच्छता अशी कामे इतर यंत्रमानव करतील. जगातील हे सर्वात कार्यक्षम हॉटेल असेल असे पार्कचे अध्यक्ष हिडिओ सावादा यांनी सांगितले. ते म्हणाले, की ९० टक्के कामे यंत्रमानव करतील. जगात अशी १००० हॉटेल सुरू करण्याचा आमचा विचार आहे. या हॉटेलमधील खर्च कमी असेल. अतिथिगृहाचे दरवाजे चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानावरून उघडले जातील. खोल्यांमध्ये कमी सुविधा असतील. टॅब्लेटच्या मदतीने तुम्ही विनंती सेवा घेऊ शकाल.