जपानचे भारतातले राजदूत सातोशी सुझुकी यांनी सांगितलं की ते अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनच्या कामातल्या प्रगतीवर खूश आहेत. देशातल्या पहिल्या हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी भारत जपानी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सुरतमधल्या अंत्रोली गावातल्या बुलेट ट्रेन स्टेशनची सुझुकी यांनी आज पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.


यावेळी बोलताना सुझुकी म्हणाले,”मी गुजरातमध्ये सुरू असलेलं बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम पाहिलं. या प्रकल्पासाठी आम्ही भारतीय तज्ज्ञांना तंत्रज्ञान देत आहोत. या प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल आम्ही समाधानी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेली बुलेट ट्रेन नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सत्यात उतरत आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री म्हणाले की, आम्ही हा प्रकल्प २०२७ पर्यंत संपवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. आम्हाला रेल्वेमंत्र्यांनी हे लक्ष्य दिलेलं आहे. आम्ही खूश आहोत की या प्रकल्पासाठी आम्हाला गुजरातमध्ये ९९ टक्के जमीन मिळाली आहे. महाराष्ट्रात ६८.७ टक्के जमीन मिळाली आहे तर दादरा आणि नगर हवेली इथं १०० टक्के जमीन मिळालेली आहे.


ते पुढे म्हणाले की, गुजरातमधल्या या प्रकल्पासाठी आम्ही डिझेलवर चालणारी यंत्रे वापरत नसून सर्व काम विजेवर सुरू आहे.


अहमदाबाद-मुंबई हा बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८.१७ किलोमीटर लांबीचा आहे. १२ स्थानके प्रस्तावित आहेत ज्यापैकी ८ गुजरातमध्ये असून ४ महाराष्ट्रात आहेत. गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती इथे स्थानके असतील तर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर इथं स्थानके उभारण्यात येत आहोत.