पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारताच्या वरिष्ठ संघात प्रथमच संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो राष्ट्रीय संघात स्थान मिळविणारा जम्मू-काश्मीरचा तिसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी, परवेज रसूल आणि उमरान मलिक यांना मर्यादित षटकांच्या भारतीय संघात स्थान मिळाले होते. ‘‘बुमरा पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याच्या जागी आकिब नबीच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्राने सांगितले.

बुमराच्या गुडघ्याची दुखापत ही गंभीर असल्याचे कळते आहे. अशातच बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सेलेन्समधील क्रीडा विज्ञानचे तज्ञ बुमराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घाईने पाठविण्याच्या बाजूने नाही. कारण, आगामी काळात भारताचा कार्यक्रम व्यग्र आहे.

श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे होईल. इंग्लंडविरुद्ध ३२ वर्षीय बुमरा लॉर्ड्स येथे झालेला तिसरा एकदिवसीय सामना जायबंदी झाल्यामुळे खेळू शकला नाही. तो इंग्लंड दौर्‍यानंतर बंगळूरुच्या सेंटर ऑफ एक्सेलेन्समध्ये दाखला झाला होता आणि दोन आठवड्यात तो दुखापतीतून सावरुन श्रीलंकविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल असे वाटत होते. मात्र, बुमराला अजूनही त्रास होत असल्याचा माहिती मिळते आहे. नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. वॉशिंग्टन कमीत कमी पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही.