Javed Akhtar on Naseeruddin Shah statement regarding PM Modi: पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी इंडियन एक्सप्रेस हिंदीच्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांच्या एका जुन्या विधानावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जुलै २०२६ मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे देशाच्या नेतृत्वावर टीका केली होती. “जर एखादी अशिक्षित व्यक्ती देशाचे नेतृत्व करत असेल तर त्याला स्वतःसारखाच संपूर्ण देश अशिक्षित, असंवेदनशील, अकार्यक्षम आणि अपयशी व्हावा असे वाटते”, असे विधान शाह यांनी केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यावेळच्या परिस्थितीत ते पंतप्रधानांना उद्देशून बोलल्याचे सांगितले गेले. या विधानावर आता जावेद अख्तर यांनी भाष्य केले असून त्यांच्या भाषेबद्दल मत व्यक्त केले.

इंडियन एक्सप्रेस हिंदीला जावेद अख्तर यांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांना नसीरुद्दीन शाह यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला गेला. शाह यांचे विधान अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किंवा राजकीय सूडाचे उदाहरण आहे का? असे अख्तर यांना विचारले गेले.

जावेद अख्तर काय म्हणाले?

या विधानावर प्रतिक्रिया देताना अख्तर म्हणाले, नसीरुद्दीन शाह यांचे विधान वैयक्तिक द्वेषातून आलेले नसेल. अशा भूमिका आणखी संयतपणे मांडता येऊ शकतात. “यात राजकीय सूड वगैरे मला वाटत नाही. नसीरुद्दीन शाह यांना देशाचे नेते व्हायचे आहे, असे तर बिलकूल नाही. पण माझ्यामते, हेच अधिक सुसंस्कृत भाषेतही बोलता आले असते. पण ते एक मध्यम वयीन अँग्री मॅन आहेत. ते याच पद्धतीत बोलतात. त्यावर मी काही बोलू शकत नाही”, असेही जावेद अख्तर पुढे म्हणाले.

जावेद अख्तर यांनी पुढे एकूणच राजकारण आणि समाजकारणातील घसरलेल्या भाषेच्या स्तरावरही भाष्य केले. ते म्हणाले, “राजकारणात असभ्य भाषा आता केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर समाजातील अनेक लोक आता अशाच पद्धतीच्या भाषेचा वापर करत आहेत. आज ज्या पद्धतीने लोक बोलत आहेत, त्या पद्धतीने पूर्वी बोलत होते का?”

“हा बदल केवळ नसीरमध्येच नाही, तर संपूर्ण समाजात दिसून येत आहे. १९५० च्या दशकात अशा प्रकारची भाषा वापरली जात नव्हती. त्या काळात डावे, उजवे, अति डावे आणि अति उजवे अशा प्रत्येक विचारसरणीचे लोक होते. तरीही त्यांच्याकडून आम्ही अशी भाषा कधीही ऐकली नाही”, असेही जावेद अख्तर म्हणाले.

तसेच केवळ नसीरुद्दीन शाह यांनाच त्यांच्या भाषेमुळे का लक्ष्य केले जात आहे? असा प्रतिप्रश्नही अख्तर यांनी विचारला. सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांच्या भाषेच्या दर्जात कमालीची घसरण झाली आहे. “फक्त नसीर यांच्यावर आक्षेप का? मी तुम्हाला १५ महनीय नेत्यांची नावे सांगू शकतो, ज्यांनी चुकीची भाषा वापरली आहे. त्यांनाही कोट्यवधी लोक ऐकत असतात”, असेही अख्तर पुढे म्हणाले.

Javed Akhtar On Religion
“९९ टक्के लोक ज्या धर्मात जन्मतात, त्याच धर्मात मरतात”; जावेद अख्तर असं का म्हणाले?

नसीरुद्दीन शाह काय म्हणाले होते?

कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीविरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. मात्र २० जुलै २०२६ रोजी संसदेवरील मोर्चादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जनंतर संतापलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी एका व्हिडीओद्वारे सरकारवर टीका केली होती.

“एखादी निरक्षर व्यक्ती देशाचे नेतृत्व करत असेल तर त्याला संपूर्ण देशच त्याच्याप्रमाणे व्हावा, असे वाटते. मी आजपर्यंत अभिनयाच्या क्षेत्रात माझ्या विद्यार्थ्यांकडून बरेच काही शिकत आलो आहे. मी प्रत्येक शिक्षक दिनाला विद्यार्थ्यांना सलाम करतो. दिल्लीत जे झाले, त्याच्यामुळे माझ्या मनात खूप वेदना आणि असंतोष निर्माण झाला आहे. गुंडाकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. तुम्ही तुमच्या मुलांचाही विचार करून बघा. तुमच्याबरोबरही एकेदिवशी न्याय होईल, हे लक्षात ठेवा”, असे विधान शाह यांनी केले होते.