Javed Akhtar on Nitish Kumar Hijab Row: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागच्या आठवड्यात आयुष डॉक्टरांना प्रमाणपत्र वाटत असताना एका मुस्लीम डॉक्टर महिलेचा हिजाब खेचला होता. त्यांच्या या कृतीविरोधात अनेकांनी टीका केली. मात्र अद्याप नितीश कुमार यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी यावर एक्स पोस्टच्या माध्यमांतून टीका केली होती. त्यानंतर जावेद अख्तर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा आव्हान दिले आहे.
इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “नितीश कुमार यांचे वर्तन असभ्य असे होते. मी धर्मावर विश्वास ठेवत नसलो आणि नास्तीक असलो तरी मला इतर धर्मांचा अनादर करण्याचा अधिकार नाही. नितीश कुमार या घटनेतून सुटतील, असा त्यांना विश्वास होता. पण ते एखाद्या हिंदू महिलेचा घुंघट (पदर) खेचण्याची हिंमत करू शकतात का?”
गीतकार जावेद अख्तर पुढे म्हणाले, “कदाचित मी नास्तिक असेन, माझा कोणत्याही धर्मावर विश्वास नाही. याचा अर्थ असा नाही की, मी मंदिरे, मशिदी आणि चर्चमधून भाविकांना हाताला पकडून बाहेर काढेन. मी ते करायला नको किंवा कुणीही करायला नको. तुम्ही एखादे कारण देऊन धर्माचा विरोध करू शकता. तुम्हाला जे वाटते, ते लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुम्ही एखाद्या महिलेचा असा अनादर करू शकत नाहीत. मग ती मुस्लीम का असेना.”
प्रकरण काय आहे?
आयुष डॉक्टरांना प्रमाणपत्रांचे वाटप करत असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लीम डॉक्टर महिलेने परिधान केलेला हिजाब खेचण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत नितीश कुमार यांना लक्ष्य केले होते.
मुख्यमंत्री सचिवालयाने १००० आयुष डॉक्टरांना प्रमाणपत्रे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात प्रतिकात्मक स्वरुपात काही निवडक डॉक्टर्सना खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्रे दिली जाणार होती. त्यानुसार एक महिला डॉक्टर प्रमाणपत्र घेण्यास पुढे आली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार महिलेला उद्देशून म्हणाले, हे काय आहे? आणि त्यांनी हिजाब दूर करण्याचा प्रयत्न केला.
