गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश भाजपाला टोला लगावला आहे. जावेद अख्तर यांनी यूपी भाजपाच्या घोषणेमध्ये हिंदीसह उर्दूच्या शब्दाच्या वापरावरून टोला लगावला. जावेद अख्तर यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत असून त्यावर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

युपीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपी भाजपाने ऑनलाइन प्रचार सुरू केला होता. योगी आदित्यनाथ सरकारचे यश सांगणाऱ्या या मोहिमेचे घोषवाक्य आहे, ‘सोच ईमानदार काम दमदार’. याच घोषणेवरून टोला लगावत जावेद अख्तर यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.

जावेद अख्तर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “युपी भाजपाचे हे घोषवाक्य पाहून आनंद झाला, ‘सोच ईमानदार काम दमदार’ या चार शब्दांच्या घोषवाक्यात तीन उर्दू शब्द आहेत. ईमानदार, काम आणि दमदार हे शब्द उर्दू आहेत,” असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान, जावेद अख्तर यांच्या या ट्वीटवर यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी लिहिले की, ‘हिंदीप्रमाणे उर्दू देखील भारताची आहे.’ तर, काहींनी म्हटलं की, ‘सरकार हिंदी आणि उर्दूमध्ये फरक करत नाही, परंतु काही लोक दोन्ही भाषांना विभाजित करतात.’