प्रवरा व मुळा धरण समूहातील वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्याविरोधात हरिश्चंद्र फेडरेशन आणि पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. याप्रकरणी प्रलंबित असलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने प्राधान्याने सुनावणी घ्यावी, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला तातडीने स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नकार दिला होता. गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश दिला आहे. जायकवाडी धरण लाभक्षेत्रात पाण्याची गरज असल्याचे सांगून भंडारदरा व मुळा धरणातून साडेसात टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या हरिश्चंद्र फेडरेशन आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.