चेन्नईतल्या पोएस गार्डनमधल्या जयललिता यांच्या निवासस्थानात जाण्यापासून आपल्याला रोखण्यात आले, असा आरोप जयललिता यांची भाची दीपा जयकुमारने केला आहे. तसेच आपला भाऊ दीपक आणि शशिकला यांनी मिळून जयललिता यांच्या हत्येचा कट रचला असाही आरोप दीपाने केला. जयललिता यांचा मृत्यू डिसेंबर २०१६ मध्ये झाला. त्यानंतर आज आपला भाऊ दीपक याने आपल्याला इथे बोलावले होते असे स्पष्टीकरण दीपा यांनी दिले आहे.

जयललिता यांच्या बंगल्यात प्रवेश करण्यावरून सुरक्षारक्षकांसोबतही तिने हुज्जत घातली. हा सगळा ड्रामा घडल्याने आज चेन्नईतल्या पोएस गार्डन परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंबंधी दिलेल्या बातमीनुसार, आज मला बंगल्याचा गेटवरच अडवण्याचा कट एआयडीएमकेच्या महासचिव शशिकला आणि उपमहासचिव टीटीव्ही दिनाकरण यांनी मिळून केला आहे, दीपक हा आपला भाऊ असून त्याने आपल्याला वारंवार फोन करून बोलावून घेतले. त्याच्या विनंतीनुसार, मी जयललिता यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी पोएस गार्डनमधल्या निवासस्थानी आले. मात्र इथे सुरक्षा रक्षकांनी मला रोखले. त्यानंतर माझा त्यांच्यासोबत वाद झाला, असेही दीपा यांनी स्पष्ट केले आहे.

या सगळ्या प्रकारानंतर दीपा यांचे पती माधवनही तिथे आले आणि सगळा हंगामा जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरक्षारक्षकांच्या म्हणण्यानुसार, जयललिता यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याची दीपा जयकुमार यांची विनंती मान्य करण्यात आली. त्यानंतर मात्र दीपाने जयललिता यांच्या घरात जाण्याची परवानगी मागितली, मात्र ती त्यांना मिळाली नाही. मात्र या सगळ्या प्रकारानंतर सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केली असाही आरोप दीपा यांनी केला आहे. दीपक यांच्यावर दीपाने वारंवार निशाणा साधत त्याने इथे बोलावल्यामुळे मी आले असा दावा केला. तसेच त्याच्यावर जयललितांच्या हत्येच्या कटाचाही आरोप केला. ही सगळी परिस्थिती सांगण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितला आहे. दीपक आणि शशिकला यांच्याबाबत आपण मोदींशी चर्चा करणार आहोत असेही दीपा यांनी म्हटले आहे.