लोकसभा निवडणुकीतला निकाल धक्कादायक होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. हा पराभव कसा झाला यावर आम्हीही अभ्यास करतो आहोत असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना याबाबत उत्तरं दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघांमध्ये मी गेलो आहे त्यावेळी राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण होतं. आम्हाला ९ ते १२ च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वाटत होता असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकांमधून आलेला कौल धक्कादायक आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. उमेदवारांशी बोलल्यानंतर वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मात्र पराभव हा पराभव असतो आम्हाला जनतेने दिला कौल आम्हाला मान्य आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

हातकणंगले मतदारसंघात शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा पराभव धक्कादायक आहे. राजू शेट्टी यांच्या सभांना मिळणाऱ्या गर्दीचा विरोधकांनी धसका घेतला होता. त्यामुळे आता शेतकरीच प्रश्न विचारत आहेत असं कसं झालं असंही जयंत पाटील यांनी सांगितले. सुरुवातीपासून वंचित आघाडीशी आम्ही चर्चा केली होती. परंतु चर्चा सुरु असतानाच ते उमेदवार जाहीर करत होते. त्यामुळे त्यांना आमच्याशी आघाडी करायची नव्हती शेवटी त्यांनी ४८ उमेदवार उभे केले. त्यांना काही ठिकाणी चांगलं मतदान झाले आहे. त्यांचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला आहे अशी स्पष्ट कबुलीही जयंत पाटील यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर हे विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचे तुम्ही सांगत आहात त्यांना शुभेच्छा परंतु आम्ही त्यांच्याशी चर्चा नक्की करु असेही जयंतराव पाटील म्हणाले. आम्हाला राज्यात चांगलं वातावरण होते. राज ठाकरे यांच्यामुळे राज्यभर जागृती चांगली झालेली होती हे नक्की असेही जयंतराव पाटील म्हणाले. महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे. लोकसभेला दिलेला कल विधानसभेला राज्यातही येईल असं वाटत नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.