JD Vance Erika Kirk Hug: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपली हिंदू पत्नी उषा व्हान्स रविवारी माझ्याबरोबर चर्चेमध्ये आल्यास मला आवडेल, असे म्हटले होते. हिंदू असलेल्या उषा धर्मांतर करणार असल्याची चर्चा यामुळे होऊ लागली. त्यानंतर जेडी व्हान्स यांनी सारवासारव करत धर्मांतराचा मुद्दा खोडून काढला. मात्र आता जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे. कारण ठरले आहे एरिका कर्कला त्यांनी सार्वजनिक मंचावर मारलेली मिठी.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे समर्थक आणि विश्वासू सहकारी चार्ली कर्क यांची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चार्ली कर्क हे उजव्या विचारसरणीच खंदे समर्थक होते. त्यानतंर त्यांची पत्नी एरिका कर्क या पहिल्यांदाच एका जाहीर मंचावर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याबरोबर दिसल्या. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. या जवळीकीमुळे अमेरिकेत विविध चर्चांना पेव फुटले आहे.
पती चार्ली आणि जेडी यांच्यात साम्य – एरिका
‘युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी’ येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात जेडी व्हान्स आणि एरिका कर्क एकत्र आले होते. एरिका कर्क यावेळी आपल्या भाषणात जेडी व्हान्स यांच्याबद्दल माहिती देतात. त्या म्हणाल्या, “आज आमच्या टीमने मला माझे मित्र जेडी व्हान्स यांना बोलविण्याची संधी दिली, तेव्हा मला मनापासून आनंद झाला. कारण माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे. माझ्या पतीची (चार्ली कर्क) जागा कुणीही घेऊ शकत नाही. पण माझे पती आणि जेडी व्हान्स यांच्यात मला बरेच साम्य दिसते.”
एरिका कर्क यांच्या या विधानामुळे आणि जेडी व्हान्स यांना मारलेल्या मिठीमुळे सोशल मीडियासह अमेरिकन माध्यमात आता व्हान्स यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी चर्चा झडू लागल्या आहेत.
मिठीची जोरदार चर्चा
एरिका कर्क यांनी जेडी व्हान्स यांना मंचावर येण्याचे आवाहन केल्यानंतर ४१ वर्षांचे आणि तीन मुलांचे वडील असलेले जेडी व्हान्स मंचावर येतात. एरिका कर्क त्यांना मिठी मारतात. यावेळी जेडी व्हान्स यांनी एरिका यांच्या कमरेवर हात ठेवल्याचे दिसते. तर एरिका कर्क आपल्या हातांनी व्हान्स यांच्या डोक्यावरील केस कुरवाळत असल्याच्या दिसल्या.
मिठीमुळे घटस्फोटाच्या अटकळी
दोघांमधील इतकी जवळीक अनेकांना खटकली. पत्रकार, इन्फ्लूएन्सर, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते दोघांच्या भेटीवर बोलत आहेत. तसेच उषा व्हान्स आणि जेडी व्हान्स हे २०२६ मध्ये घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखिका शॅनॉन वॉट्स यांनी एक्सवर घटस्फोटाची चर्चा सुरू करणारी पोस्ट केली आहे.
वॉट्स यांनी म्हटले की, २०२६ च्या अखेरीस जेडी व्हान्स घटस्फोट जाहीर करतील आणि चार्ली कर्क यांची विधवा एरिका कर्कशी लग्न करतील. शॅनॉन वॉट्स यांच्या पोस्टला ९ दशलक्ष हून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे गेल्या काही काळापासून उजव्या विचारसरणीचे आणि श्वेत अमेरिकन्सची भलामन करणारे कट्टरतावादी मानले जात आहेत. मात्र हिंदू पार्श्वभूमी असलेल्या उषा व्हान्स यांच्याशी लग्न केल्यामुळे त्यांना अनेकदा श्वेत अमेरिकन नागरिकांचा रोषही सहन करावा लागला आहे.
२०२८ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी जेडी व्हान्स उत्सुक आहेत. पण मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) समर्थक हिंदू पत्नी असलेला राष्ट्राध्यक्ष स्वीकारणार नाहीत. यामुळेही जेडी व्हान्स घटस्फोट घेऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
