JD Vance reacts to Iran’s 10-point ceasefire proposal involving ChatGPT usage : इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्षाला विराम मिळाला अशून पाकिस्तानच्या पुढाकाराने बुधवारी शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर तिन्ही देशांमध्ये मतैक्य झाले आहे. या शस्त्रसंधीसाठी इराणने अमेरिकेला १० कलमी प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाबाबत अमेरिकेचे उपध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. इराणच्या १० कलमी प्रस्तावाच्या अनेक आवृत्त्यांमुळे वाटाघाटींदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याचे अमेरिकेचे उपध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी गुरुवारी सांगितले.
हंगरी येथून बाहेर पडताना व्हान्स यांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की इराणच्या प्रस्तावाची पहिली आवृत्ती तात्काळ नाकारण्यात आली . “सुरुवातीला जो पहिला १० कलमी प्रस्ताव सादर करण्यात आला, स्पष्टच सांगायचे झाले तर तो आमच्या मते कदाचित चॅट जीपीटी वापरून लिहिलेला असावा. हा प्रस्ताव स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर यांच्याकडे सादर करण्यात आला आणि तो कचराकुंडीत फेकण्यात आला आणि तात्काळ नाकारण्यात आला होता,” असे व्हान्स म्हणाले.
व्हान्स म्हणाले प्रस्तावाची दुसरी आवृत्ती ही अधिक वास्तववादी होती आणि सध्याच्या चर्चेसाठी तीच आधार ठरली. “दुसरा १० कलमी प्रस्ताव हा अधिक व्यावहारिक होता, जो की आम्ही, पाकिस्तानी आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेवर आधारीत होता. त्याचाच संदर्भ काल राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये दिला होता,” असे व्हान्स म्हणाले. तसेच व्हान्स सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या प्रस्तावाच्या तिसऱ्या आवृत्तीबद्दल बोलताना म्हणाले की, ही आवृत्ती पहिल्या ड्राफ्टपेक्षाही अतिरेकी मागण्या करणारी होती.
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत, यादरम्यान व्हान्स यांनी हे विधान केले आहे. इराणने दिलेल्या १० कलमी प्रस्तावाचे वेगवेगळे ड्राफ्ट आणि त्याचे वेगवेळे अर्थ काढले जात असल्याने संभाव्य प्रस्तावित कराराच्या रूपरेषेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
