अमेरिका आणि इराण युद्ध अखेर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर संपलं आहे. युद्ध समाप्तीच्या करारावर अखेर दोन्ही देशांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही देशांत शांतता करारासंदर्भात चर्चा सुरू होत्या. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार व्हावा, यासाठी कतार आणि पाकिस्ताननेही मध्यस्थी केली होती. मात्र, आता अमेरिका-इराण शांतता कराराबाबत बोलताना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची नाचक्की झाल्याची चर्चा रंगली आहे.

जेडी व्हान्स यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना इराणबरोबर सामंजस्य कराराचा तपशील जाहीर करण्यास झालेला विलंब हा अंशतः पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या मुद्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ जून रोजी या तात्पुरत्या शांतता कराराची घोषणा केली होती. मात्र, या सामंजस्य कराराचा अधिकृत मसुदा दोन दिवसांनंतर जाहीर करण्यात आला होता. त्या संदर्भातील कारण सांगताना पाकिस्तान आणि कतारमध्ये प्रसारमाध्यमांना अमेरिकेसारखं पूर्ण स्वातंत्र्य नाही, असं जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.

जेडी व्हान्स यांनी काय म्हटलं?

इराण शांतता कराराच्या अटी जाहीर करण्यास झालेल्या विलंबाबाबत प्रश्न विचारला असता जेडी व्हान्स यांनी म्हटलं की, “आम्हाला खरं तर तो करार जाहीर करायचा होता. पण मला वाटतं पाकिस्तान आणि कतारच्या प्रणालींमध्ये अमेरिकेतील ‘फर्स्ट अमेंडमेंट’ (अभिव्यक्ती स्वातंत्र्याची घटनात्मक तरतूद) किंवा प्रसारमाध्यमांच्या पूर्ण स्वातंत्र्यासारखी तरतूद नाही. प्रसारमाध्यमांचं पूर्ण स्वातंत्र्य नाही. पाकिस्तान आणि कतारमधील व्यवस्थांमध्ये प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य किंवा ‘फर्स्ट अमेंडमेंट’ (पहिली घटनादुरुस्ती) यांसारख्या तरतुदी नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अशी अपेक्षा नसते की कराराचा मसुदा लगेच जनतेसमोर खुला केला जाईल. जेणेकरून ते त्यावर प्रश्न उपस्थित करू शकतील, तो पाहू शकतील, त्याचे विश्लेषण करू शकतील आणि स्वतःहून तो समजून घेऊ शकतील. पण आता आम्ही नक्कीच जाहीर केरू”, असं जे.डी.व्हान्स यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पाकिस्तानची नाचक्की?

जे.डी.व्हान्स यांच्या या विधानामुळे पाकिस्तानमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यात झालेली घसरण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच इराण शांतता कराराच्या अटी जाहीर करण्यास झालेल्या विलंबाला जेडी व्हान्स यांनी पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तानची नाचक्की झाल्याचं बोललं जात आहे.

अमेरिका आणि इराणकडून शांतता करारावर स्वाक्षऱ्या

अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिकृतरित्या संपलं आहे.