Usha Vance Helicopter Video : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हेलिकॉप्टरमधून उतरत असताना त्यांचा तोल जात असल्याचे दिसते, मात्र छातीला बांधलेल्या अवघ्या नऊ आठवड्यांच्या बाळाला सुरक्षित ठेवत त्यांनी काही क्षणांत स्वतःला सावरले. ही घटना सोमवारी (५ ऑक्टोबर) मेरीलँडमधील ‘जॉईंट बेस अंड्रयूज’ येथे घडली. उषा व्हान्स यांच्या छातीला त्यांचा नवजात मुलगा ॲलेक नील व्हान्स बांधलेला होता. त्याचबरोबर त्यांच्या हातात मोठी डायपर बॅगही होती.

पायरीवर अचानक तोल गेला

व्हिडीओमध्ये उषा व्हान्स हेलिकॉप्टरच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसतात. एका हाताने रेलिंग पकडून त्या खाली येत असताना काही पायऱ्या उतरल्यावर त्यांचा अचानक तोल जातो आणि त्या पुढे झुकतात. मात्र त्यांनी तात्काळ स्वतःला सावरलं आणि बाळाला कोणताही धोका पोहोचू नये याची काळजी घेतली. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरकडे वळून पती जेडी व्हान्स यांना आपण ठीक असल्याचा इशारा करताना दिसतात.

‘मी जवळपास पायऱ्यांवरून पडले’

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, उषा व्हान्स यांनी जवळच्या अधिकाऱ्यांना, “मी जवळपास पायऱ्यांवरून पडले,” असे सांगितल्याचे दिसते. लिप-रीडर निकोला हिकलिंग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पुढे “मी ठीक आहे आणि तोही ठीक आहे,” असे म्हटले. यानंतर जेडी व्हान्स हेलिकॉप्टरमधून खाली आले. त्यांच्या हातात दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी मिराबेल होती.

‘कोणी मदतीला का आलं नाही?’

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही युजर्सनी उषा व्हान्स यांना मदत करण्यासाठी जवळचे अधिकारी पुढे का आले नाहीत, असा सवाल केला. तर काहींनी उषा व्हान्स यांनी बाळाला वाचवताना प्रसंगावधान राखून स्वतःला सावरल्याचे कौतुक केले. एका युजरने हा प्रसंग पाहून, “केवळ आईच अशा प्रकारे बाळाला सुरक्षित ठेवू शकते,” अशी प्रतिक्रिया दिली. काही युजर्सनी त्यांच्या हातात असलेल्या डायपर बॅगकडेही लक्ष वेधत, अशा परिस्थितीत कोणीतरी त्यांना ती बॅग घेण्यासाठी मदत करायला हवी होती, असे म्हटले.

१९ जुलैला झाला ॲलेकचा जन्म

उषा आणि जेडी व्हान्स यांनी १९ जुलै रोजी त्यांच्या चौथ्या अपत्याचे स्वागत केले. ‘वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर’ येथे ‘ॲलेक नील व्हान्स’चा जन्म झाला. ॲलेक हा या दाम्पत्याचा चौथा मुलगा आहे. त्याला इवान (९), विवेक (६) आणि मीराबेल (४) ही भावंडं आहेत.

दरम्यान, व्हान्स कुटुंब अँकरेजला रवाना झाले होते. जेडी व्हान्स येथे रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.