केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितिशकुमार यांना पंतप्रधानपदाची महत्त्वकांशा आहे, आरोप केला होता. शाहांच्या या आरोपाला जेडीयूने प्रत्युत्तर दिले आहे. नितिशकुमार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नसून त्यांना भाजपामुक्त भारत करायचा आहे, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे प्रमुख राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – धक्कादायक, म्यानमारमध्ये भारतीयांना बनवले बंधक, करुन घेतली जातात ‘ही’ कामे; अन्यथा…

“…तरच भारत भाजपमुक्त होऊ शकतो”

“भाजपा ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. भाजपा तपास यंत्रणांची श्वासार्हता नष्ट करत आहे. नितिशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. त्यांना फक्त विरोधी पक्षांना एकत्र आणायचे आहे. विरोधकांच्या एकजुटीनेच भारत भाजपमुक्त होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी दिली आहे.

हेही वाचा – काँग्रसने परवानगी न घेता मोहिमेसाठी फोटो वापरल्याने संतापला अभिनेता; राहुल गांधींना टॅग करत म्हणाला, “बेकायदेशीर…”

अमित शाहांची नितिशकुमारांवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारच्या पूर्णिया येथे झालेल्या सभेदरम्यान नितीश कुमार यांनी आपल्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आरजेडी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. “नितिशकुमार यांना कोणतीही विचारधारा नाही. त्यामुळे त्यांनी समाजवाद सोडत जातीवर आधारित राजकारण सुरू केले आहे”, असेही अमित शाह म्हणाले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारची जनता या महाआघाडीचा पराभव करेल. तसेच २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये पूर्ण बहुमताचे भाजप सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.