आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता या वादात दोन्ही पक्षाच्या समर्थकांनीही उडी घेतली आहे. लालूप्रसाद यांनी मंगळवारी नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आणि जेडीयूचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते खासदार आरसीपी सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आरसीपी सिंह यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले असून लालू यादव हे एक गर्विष्ठ व्यक्ती असून त्यांचा एक पाय तुरूंगात तर दुसरा स्मशानभूमीत असल्याची टीका त्यांनी केली. सिंह यांच्या टीकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितीश कुमार हे आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेत असल्याचा आरोप लालूंनी केला होता.

‘एबीपी न्यूज’ बरोबर बोलताना खासदार आरसीपी सिंह यांनी लालूंचे सर्व आरोप फेटाळले. लालूप्रसाद हे हताश आणि निराश झाले आहेत. लालूप्रसाद यांच्याबरोबर जाणे ही जेडीयूची राजकीय चूक नव्हती. त्यावेळची परिस्थिती आणि त्यांनी दिलेल्या ‘ऑफर’मुळे जेडीयूने त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. नितीश कुमार यांच्या ‘डिक्शनरीत’ हांजीहांजी करणे हा शब्द नाही. ते कधीच लालूप्रसाद यांच्यासमोर झुकले नाहीत. उलट लालूप्रसादच त्यांच्यासमोर झुकल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, लालूप्रसाद यांना माहीत आहे की, मी गेल्या २० वर्षांपासून नितीश कुमार यांच्याबरोबर आहे. वर्ष २००५ पासून लालूप्रसाद माझ्या मागे लागले आहेत. त्यांच्यामुळे मी व्हीआरएस घेतली होती. लालूप्रसाद स्वत: अधिकाऱ्यांना फोन करत. ते काही सामाजिक कार्यासाठी नव्हे तर बदलीसाठी फोन करत, असा आरोपही केला.

बिहारमध्ये दारूची होम डिलेव्हरी होते हे लालूंना कसे माहीत झाले होते ? जर होम डिलेव्हरी होत असेल तर त्यांनी सांगावे की त्यांच्या घरी किंवा त्यांच्या परिचितांच्या घरी अशी होम डिलिव्हरी व्हायची का? जेव्हा आम्ही लालूंबरोबर गेलो होतो. तेव्हा आम्हाला फक्त चाऱ्याची माहिती होती. लाराची आता माहिती झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.