राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपशी हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी दंड थोपटले आहेत. बंडखोरीचा मार्ग अवलंबून त्यांनी आज दिल्लीत सांस्कृतिक वारसा बचाव या ‘मेगा शो’चे आयोजन केले आहे. या शोमधून ते शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. यासाठी त्यांनी विरोधी पक्षांना निमंत्रित केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, सपाचे नेते अखिलेश यादव, सिताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

देशाचा सांस्कृतिक वारसा वाचवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमातून शरद यादव हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, नितीश कुमार यांच्याशी मतभेद आणि भविष्यातील राजकीय वाटचाल याबाबत त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. हा कार्यक्रम कुणाविरोधात नसून देशहितासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सांस्कृतिक वारसा हा घटनेचा आत्मा आहे. त्याला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यापुढील काळात देशभरात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हा कार्यक्रम कुणा एका व्यक्तीविरोधात नाही. देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हितासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित वेमुला आत्महत्या, जेएनयूचा विद्यार्थी नजीब अहमद बेपत्ता प्रकरण, देशभरात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. देशातील वंचित लोकांची स्थिती सध्या वाईट आहे, असेही ते म्हणाले. हिंसाचाराला थारा देणार नाही म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी समर्थन केले.