राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणारा संयुक्त जनता दल उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मात्र विरोधकांना पाठिंबा देणार आहे. संयुक्त जनता दलाचे महासचिव के. सी. त्यागी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे पाठोपाठ होणाऱ्या दोन निवडणुकांमध्ये संयुक्त जनता दलाच्या दोन वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

‘उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष ज्या उमेदवाराची निवड करतील, त्या उमेदवाराला संयुक्त जनता दलाकडून पाठिंबा दिला जाईल,’ असे के. सी. त्यागी यांनी म्हटले. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने घेतलेली भूमिका यू टर्न समजली जाते आहे. याआधी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा १७ विरोधी पक्षांची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने उमेदवाराची निवड व्हायला हवी. संयुक्त जनता दल उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या सोबत असेल,’ असे पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी सांगितले.

‘नितीश कुमार यांचा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांच्या नावाला पसंती देण्याचा निर्णय हा अपवादात्मक होता. आम्ही उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची एकता भंग पावू देणार नाही,’ असेदेखील के. सी. त्यागी यांनी म्हटले. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी सुचवलेल्या उमेदवाराचा विचार करण्याचे संकेत दिल्यावर संयुक्त जनता दलाकडून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र याआधी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्याने इतर पक्षांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘याविषयी प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. भाजपच्या संसदीय समितीने अद्याप याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही,’ असे मोदी यांनी म्हटले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी नितीश कुमार यांनी विरोधकांना एकता राखण्याचे आवाहन केले होते. मात्र नितीश कुमार यांनी स्वत:च भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.