केंद्रीय निवडणूक आयुक्तांमधील अंतर्गत मतभेदांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची मंगळवारी एक महत्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्यात नितीश कुमार यांच्यावरून मतभेद दिसून आले.

इंडिया आघाडीतून नितीश कुमार यांच्या बाहेर पडण्यावरून सोनिया गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्यात कथित मतभेद पाहायला मिळाले. नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते, असा कथित दावा सोनिया गांधी यांनी केला, तर नितीश कुमारांना इंडिया आघाडीतून बाहेर पडू द्यायला नको होतं, अस मत दिग्विजय सिंह यांनी मांडलं. सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडंनी हे वृत्त दिलं.

दरम्यान, नितीश कुमार यांच्यावर टीका केल्याच्या वृत्तानंतर जनता दल (युनायटेड) ने बुधवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘नितीश कुमार यांना तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही’, असं म्हणत केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी जोरदार टीका केली.

राजीव रंजन सिंह काय म्हणाले?

“नितीश कुमार यांच्याबद्दल सोनिया गांधींनी केलेल्या टिप्पणीवर आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण नितीश कुमार यांना सोनिया गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. नितीश कुमार यांनी आपल्या कामाच्या जोरावर २० वर्ष बिहारच्या जनतेची सेवा करत राज्याचं चित्र बदलून टाकलं आहे. आज देशातच नव्हे, तर जगभरात त्यांची चर्चा होत आहे”, असं राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

“नितीश कुमार काही काळ इंडिया आघाडीत असताना त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या आग्रहामुळे सोनिया गांधींनी जातीनिहाय जनगणनेची काहीही गरज नसल्याचं म्हटलं होतं”, असा दावा राजीव रंजन सिंह यांनी केला.

संजय कुमार झा काय म्हणाले?

“दिग्विजय सिंह यांच्या विधानांवरून असं दिसून येतं की काँग्रेसला नितीश कुमार यांचं महत्त्व उशिरा का होईना पण समजलं. पण देशातील आणि बिहारमधील जनतेला हे आधीच माहिती होतं. नितीश कुमार यांचं काम सर्वांसमोर आहे. त्यामुळे सत्य हे आहे की उशिरा का होईना पण काँग्रेसला आता हे समजलं आहे”, असं म्हणत जेडीयूचे नेते संजय कुमार झा यांनी काँग्रेसवर टीका केली.

सोनिया गांधींनी काय म्हटलं होतं?

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह यांनी बैठकीत मत मांडताना म्हटलं की, “नितीश कुमार यांना आपण इंडिया आघाडीतून बाहेर पडू द्यायला नको होतं. जर ते इंडिया आघाडीत राहिले असते, तर आज राजकीय परिस्थिती वेगळी असती.” दरम्यान, दिग्विजय सिंह यांच्या या मतावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देत त्यांची भूमिका मांडली. सोनिया गांधी यांनी म्हटलं की, “नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची आणखी उशिरा साथ सोडली असती, तर अधिक नुकसान झालं असतं. त्यामुळे नितीश कुमार वेळेत बाहेर पडले आहेत. त्यांना शेवटी तिकडे जायचंच होतं. नितीश कुमार हे सतत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत होते”, असं सोनिया गांधींनी म्हटल्याची चर्चा आहे.