JEE Advanced Toppers Success Stories: स्पर्धेच्या युगात जिथे अवघ्या एका गुणासाठी जीवघेणी चुरस पाहायला मिळते, तिथे कोटा (राजस्थान) येथील एकाच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन जिगरी मित्रांनी मैत्री आणि यशाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात एकाच हॉस्टेलमधील दोन मित्रांनी देशात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावत इतिहास रचला आहे.
बिहारच्या शुभम कुमारने ‘ऑल इंडिया रँक १’ (AIR 1) मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे, तर त्याचाच हॉस्टेलमधील पार्टनर आणि मित्र गुरुग्रामच्या कबीर छिल्लरने ‘ऑल इंडिया रँक २’ (AIR 2) वर झेप घेतली आहे. ३६० गुणांच्या या परीक्षेत शुभमला ३३० तर कबीरला ३२९ गुण मिळाले. विशेष म्हणजे, गुणवत्ता यादीत या दोन्ही मित्रांमध्ये अवघ्या ‘१’ गुणाचा फरक आहे, पण या एका गुणाने त्यांच्या मैत्रीत जराही अंतर आणले नाही.
अन् हॉस्टेलमध्ये मध्यरात्री झाला जल्लोष
यंदा या परीक्षेचे आयोजन आयआयटी रुरकीतर्फे करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास निकाल जाहीर झाला आणि कोटा या कोचिंग हबमध्ये आनंदाची लाट आली. गेल्या दोन वर्षांपासून एकाच हॉस्टेलमध्ये राहून, ‘एलन करिअर इन्स्टिट्यूट’मधून एकत्र अभ्यास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी देशात पहिले दोन रँक पटकावण्याची ही दुर्मिळ घटना आहे. हॉस्टेलमध्ये शुभम चौथ्या मजल्यावर तर कबीर सातव्या मजल्यावर राहायचा. दिवसभर क्लास, टेस्ट सिरीज आणि रिव्हिजनमध्ये व्यस्त असणाऱ्या या दोघांचा प्रवास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नव्हता.
बॅडमिंटनच्या कोर्टवर हलका व्हायचा अभ्यासाचा ताण
अभ्यासाचा प्रचंड ताण आणि थकवा दूर करण्यासाठी हे दोन्ही मित्र रोज संध्याकाळी आवर्जून बॅडमिंटन खेळायचे. फॉर्म्युले, इक्वेशन्स आणि मॉक टेस्टच्या गर्दीतून मानसिक संतुलन राखण्यासाठी या खेळाने त्यांना मोठी मदत केली. अभ्यासासोबतच मन ताजेतवाने ठेवण्याची त्यांची ही युक्ती कमालीची यशस्वी ठरली, असे दोघांनी सांगितले.
मत्सराऐवी मैत्रीचा आनंद, कबीरची खिलाडूवृत्ती चर्चेत
अवघ्या एका गुणाने देशातील पहिला क्रमांक हुकल्यास कोणत्याही विद्यार्थ्याला दुःख होणे स्वाभाविक आहे. मात्र, ‘जेईई मेन २०२६’ मध्ये देशात पहिला आलेल्या कबीरने आपल्या मित्राच्या यशाचा मोठ्या मनाने जल्लोष केला. “शुभमने गेल्या दोन वर्षांत प्रचंड मेहनत घेतली आहे, तो या यशासाठी पूर्णपणे पात्र आहे. माझ्या जागी जर इतर कोणी असतं, तर त्याला कदाचित वाईट वाटलं असतं. पण माझ्याच मित्राने पहिला क्रमांक पटकावलायं, याचा मला पश्चाताप नाही तर सार्थ अभिमान आणि आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया कबीरने माध्यमांशी बोलताना दिली. कबीरच्या या समजूतदारपणाची आणि खिलाडूवृत्तीची सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
या वेळेसेच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये:
- तिसरा क्रमांकही कोटाकडे: सीकरच्या जतीन चहरने ३१९ गुणांसह देशात तिसरा क्रमांक (AIR 3) पटकावला. (पहिले तिन्ही मानकरी एलन कोचिंगचे विद्यार्थी आहेत).
- मुलींमध्ये आरोही देशपांडे अव्वल: दिल्ली झोनमधील आरोही देशपांडे हिने २८० गुणांसह मुलींच्या प्रवर्गात देशात पहिला क्रमांक पटकावला असून, कॉमन रँक लिस्टमध्ये तिने ७७ वे स्थान मिळवले आहे.
- एकूण पात्र विद्यार्थी: यंदा १ लाख ८७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ज्यापैकी ५६,८८० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आता हे सर्वजण ‘जोसा’ (JoSAA) कौन्सिलिंग प्रक्रियेत सहभागी होतील.
आता दोघांचेही स्वप्न ‘आयआयटी मुंबई’चे
एकत्र स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करणाऱ्या या दोन्ही मित्रांना आता आयआयटी बॉम्बे मधून ‘कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग’चे शिक्षण घ्यायचे आहे. परीक्षा म्हणजे केवळ गुणांची शर्यत नसून, या प्रवासात सोबत चालणारे मित्रही तितकेच महत्त्वाचे असतात, हेच या दोघांनी सिद्ध केले आहे.
