NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे देशभरात गदारोळ माजला असतानाच, केंद्र सरकारने आता देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘JEE’ आणि ‘NEET’ या परीक्षा एकत्र करून ‘एकच संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा’ (Joint Entrance Exam) घेण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. संसदीय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत.
इस्रोच्या माजी प्रमुखांच्या समितीने केली शिफारस
२०२४ मधील NEET-UG परीक्षेतील गोंधळानंतर, केंद्र सरकारने इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) च्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात पदवी प्रवेशासाठी ‘एकच सामायिक परीक्षा’ घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या नवीन रचनेनुसार, JEE आणि NEET या परीक्षा एकाच छताखाली आणल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाखेनुसार वेगवेगळ्या विषयांचे पर्याय असतील.
कशी असेल नवीन परीक्षा पद्धत?
या पध्दतीमुळे कालांतराने JEE आणि NEET सारख्या परीक्षा एकाच सामायिक चौकटीखाली आणल्या जाऊ शकतील, ज्यामध्ये विविध शाखांसाठी विषयांचे घटक मात्र स्वतंत्र असतील. शिक्षण, महिला, बाल, युवक आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीच्या अनेक सदस्यांनी या ‘सिंगल टेस्ट स्ट्रक्चर’च्या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. या रचनेत अभियांत्रिकीच्या इच्छुकांसाठी ‘गणित’ आणि वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी ‘जीवशास्त्र’ असे स्वतंत्र विभाग असतील. अभियांत्रिकीसाठी विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर द्यावा लागेल. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाचा पेपर द्यावा लागेल. मुख्य आराखडा एकच असला, तरी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या निवडीनुसार विषयांचे वर्गीकरण केले जाईल.
NEET साठी वयोमर्यादा आणि ‘अटेंप्ट्स’चे बंधन येणार?
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी काळात नियम आणखी कडक होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीने NEET परीक्षेसाठी ‘प्रयत्नांची संख्या’ (Number of Attempts) आणि ‘वयोमर्यादा’ निश्चित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे ही परीक्षा इतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांप्रमाणेच शिस्तबद्ध होईल, असा दावा केला जात आहे.
पेपरफुटी रोखण्यासाठी ‘NTA’ चा नवा अॅक्शन प्लॅन!
NEET-UG २०२६ चा पेपर लीक झाल्याच्या आरोपांनंतर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या पार्श्वभूमीवर NTA चे महासंचालक अभिषेक सिंग आणि उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांनी संसदीय समितीला भविष्यातील उपाययोजनांची माहिती दिली.
- परीक्षा घेण्यासाठी खाजगी कंपन्यांवरील (Third-party agencies) अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी केले जाईल. NTA स्वतःची सुरक्षित तांत्रिक पायाभूत सुविधा विकसित करत आहे.
- प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप पूर्णपणे रोखला जाईल.
- परीक्षा पेन-पेपर ऐवजी संगणकावर (Online) घेण्याबाबत तयारी सुरू आहे. यासाठी राज्यांची तयारी, पायाभूत सुविधा आणि परीक्षेची वारंवारता यावर चर्चा झाली.
“संसदीय समितीची ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली. सर्वपक्षीय सदस्यांनी देशातील परीक्षा पद्धतीच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.” – दिग्विजय सिंग, अध्यक्ष, संसदीय स्थायी समिती (वरिष्ठ काँग्रेस नेते)
२२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला; २१ जूनला फेरपरीक्षा
यावर्षी ३ मे रोजी देशातील आणि परदेशातील ५,५०० हून अधिक केंद्रांवर NEET-UG २०२६ परीक्षा पार पडली होती. तब्बल २२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीच्या मोठ्या प्रकरणानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात विद्यार्थी आणि विरोधकांनी तीव्र आंदोलने केली. सध्या या संपूर्ण गैरव्यवहाराचा तपास CBI करत आहे. दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्थेत आगामी २१ जून रोजी NEET ची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार ‘वन नेशन, वन एक्झाम’चा निर्णय कधी घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
