Jeffrey Sachs analyzes Donald Trump’s mental health and Iran war: अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व सरकारी धोरणांचे अभ्यासक प्रोफेसर जेफ्री साक्स यांनी अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध आणि डोनाल्ड ट्रम्प व बिन्यामिन नेतान्याहू यांच्या लहरी निर्णयांवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, या दोघांना आवरायचं असेल, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीच पुढाकार घ्यायला हवा, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. नावाजलेले पत्रकार आफशिन रॅटनसी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये साक्स यांनी ट्रम्प व नेतान्याहू यांच्या निर्णयांवर तोंडसुख घेतलं.
डोनाल्ड ट्रम्प हे मनोविकृत तर नेतान्याहू भ्रमिष्ट!
जेफ्री साक्स यांनी मुलाखतीदरम्यान अमेरिका-इराण युद्धाचं विश्लेषण केलं. त्यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प हे एक मनोविकृत असून त्यांचे मित्र बिन्यामिन नेतान्याहू भ्रमिष्ट असल्याची टीका केली. “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना Dark Triad Personality नावाचा मनोविकार जडला आहे. ते आत्मस्तुतीत धन्यता मानतात. तसेच, स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही मार्गांचा अवलंब करणाऱ्या मॅकियाविलियन धोरणाचा त्यांनी स्वीकार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प अशी व्यक्ती आहे, ज्यांच्यावर तुम्ही अगदी काही क्षणांसाठीदेखील विश्वास ठेऊ शकत नाही. ते एक मनोविकृत आहेत”, अशा शब्दांत जेफ्री साक्स यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.
“मी काही मनोविकारतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ किंवा एखादा लष्करी तज्ज्ञदेखील नाही. पण अशा तज्ज्ञांशी मी नेहमी चर्चा करत असतो. त्यांना वाटतंय की डोनाल्ड ट्रम्प यांची अस्थिरता दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यांना Frontotemporal Dementia नावाचा मेंदूचा आजार जडला आहे, ज्यामुळे त्यांच्यात या अशा संदिग्ध वृत्ती तयार झाल्या आहेत. ज्या पद्धतीने ते सार्वजनिक ठिकाणी बोलतात, ते याचं उत्तम उदाहरण आहे. ही फार गंभीर बाब आहे”, असं साक्स यांनी मुलाखतीत नमूद केलं.

अमेरिका व इस्रायलचा विनाकारण थयथयाट!
यावेळी बोलताना जेफ्री साक्स यांनी अमेरिका व इस्रायलकडून या युद्धात उचलण्यात आलेली पावलं म्हणजे बेजबाबदारपणे केलेली बेकायदेशीर कृ्त्यं असून ती अतिशय गंभीर आहेत. तो विनाकारण दाखवण्यात आलेला आक्रमकपणा आहे. या युद्धाला ‘वॉर ऑफ चॉईस’ असं म्हटलं गेलं. पण हे युद्ध ट्रम्प आणि नेतान्याहू यांना आलेल्या हुक्कीमुळे सुरू झालंय, असा स्पष्ट दावा जेफ्री साक्स यांनी केला.
“बिन्यामिन नेतान्याहूंनाही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखाच आजार”
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंनादेखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच आजार जडल्याची टीका साक्स यांनी केली. “नेतान्याहूंनी इराणवर युद्धाचे १० संघर्ष लादले. हे संघर्ष हिब्रू बायबलमध्ये नमूद करण्यात आले आहेत. हे प्रत्यक्ष ईश्वराकडून लादले जातात. आता नेतान्याहू स्वत:लाच ईश्वर समजू लागले आहेत. हा एक प्रकारचा वेडेपणाच आहे. ही काही राजकीय चाल नाही. हा वेडेपणा आहे कारण हे सगळं वास्तवाच चाललेल्या युद्धाबाबत आणि हत्यांबाबत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की इराणला पुन्हा अश्मयुगात ढकलून देणार. हे सामान्य नाही”, असं जेफ्री साक्स म्हणाले.
जगाला भारत, चीन आणि रशियाच वाचवू शकतात – जेफ्री साक्स
डोनाल्ड ट्रम्प व बिन्यामिन नेतान्याहू यांच्या या लहरी कृत्यांपासून जगाला फक्त भारत, चीन व रशिया हे तीन देशच वाचवू शकतात, असा आशावाद जेफ्री साक्स यांनी व्यक्त केला. “डोनाल्ड ट्रम्प व बिन्यामिन नेतान्याहू यांचा हा वेडेपणा थांबवण्यासाठी प्रगल्भ देशांचीच आवश्यकता आहे. सध्या जगात असे तीनच पर्याय अस्तित्वात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन. हे तिघेही अमेरिकेव्यतिरिक्तच्या जगातल्या इतर तीन महासत्तांचे प्रमुख आहेत. जग उद्ध्वस्त न होण्यात त्यांचंही नक्कीच हित आहे”, असं साक्स यांनी नमूद केलं.
अमेरिका-इराण शांतता चर्चा निष्फळ
दरम्यान, एकीकडे युद्धविरामामुळे सुटकेचा निश्वास टाकणाऱ्या जगभरातील देशांची अमेरिका-इराण शांतता चर्चा निष्फळ झाल्यामुळे चिंता वाढली आहे. शनिवारी पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी जवळपास २१ तास चर्चा केली. पण अखेर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे कोणत्याही तोडग्याशिवायच अमेरिकेला परतले. त्यानंतर सोमवारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत डोनाल्ड ट्रम्प यांनी “इराण माझ्याशी पुन्हा शांततेवर चर्चा करायलं आलं किंवा नाही, मला फरक पडत नाही”, असं म्हणत त्या चिंतेत भर टाकली.
दुसरीकडे इराणच्या संसदेचे अध्यक्ष व या चर्चेत इराणचं प्रतिनिधित्व करणारे मोहम्मद बघेर गालिबाफ यांनी “अमेरिकेचं शिष्टमंडळ आमचा विश्वास पुन्हा जिंकण्यात अपयशी ठरलं”, असं म्हणत चर्चा निष्फळ झाल्यावर शिक्कामोर्तबच केलं. पण त्याचवेळी, चर्चेच्या पुढच्या फेरीसाठीही तयार असल्याचं नमूद करत चर्चेची शक्यता जिवंत ठेवली आहे.
