Jemima Goldsmith Marriage : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी आणि ब्रिटिश लेखिका-चित्रपट निर्मात्या जेमिमा गोल्डस्मिथ यांनी त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जेमिमा यांनी १२ सप्टेंबर रोजी व्यावसायिक कॅमेरॉन ओ’रेली यांच्यासोबत एका खासगी समारंभात लग्न केले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. ५२ वर्षीय जेमिमा यांनी ६२ वर्षीय कॅमेरॉन यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत हा खास दिवस अविस्मरणीय बनवणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या लग्नातील एक भावनिक क्षणही त्यांनी सांगितला. त्यांची मुले सुलेमान आणि कासिम खान यांनी आईला लग्नाच्या मांडवापर्यंत नेले. याबद्दल सविस्तर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

मुलांनी आईला लग्नाच्या मांडवापर्यंत नेले

जेमिमा आणि इम्रान खान यांची मुले सुलेमान आणि कासिम यांनी लग्नाच्या वेळी आईची साथ दिली. जेमिमा यांनी त्यांचे आभार मानले. इम्रान खान यांच्यासोबत जेमिमा यांना दोन मुले आहेत. जेमिमा यांनी १९९५ मध्ये इम्रान खान यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी त्या २१ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर त्या पाकिस्तानमध्ये राहायला गेल्या. २००४ मध्ये नऊ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता दोन्ही मुलांनी आईच्या दुसऱ्या लग्नात महत्त्वाची भूमिका निभावली.

सावत्र मुलगी ‘मेड ऑफ ऑनर’

जेमिमा यांनी त्यांची सावत्र मुलगी टायरियन व्हाइट हिचेही विशेष आभार मानले. टायरियनने लग्नात ‘मेड ऑफ ऑनर’ची भूमिका निभावली. कॅमेरॉन यांच्या मुली साशा आणि तारा ओ’रेली या जेमिमा यांच्या ब्राइड्समेड्स होत्या. त्यांच्यासोबत एडी आणि एलिझा यांचाही ब्राइड्समेड्समध्ये समावेश होता. लग्नाच्या समारंभात ब्ल्यूई आणि आर्थर यांनी पेजबॉयची भूमिका निभावली.

कॅमेरॉनचे मुलगे ‘बेस्ट मॅन’

कॅमेरॉन यांचे मुलगे इलियट आणि ऑस्कर ओ’रेली हे त्यांचे ‘बेस्ट मॅन’ होते. जेमिमा यांनी त्यांचे पुतणे फ्रँकी, आयझॅक आणि जेम्स गोल्डस्मिथ तसेच कॅमेरॉन यांचे भाऊ गॅव्हिन आणि टोनी ओ’रेली यांचाही लग्नातील विशेष भूमिकांसाठी उल्लेख केला.

ऑस्कर डे ला रेंटाचा खास गाऊन

लग्नासाठी जेमिमा यांनी प्रसिद्ध फॅशन ब्रँड ऑस्कर द ला रेंटा यांचा खास तयार केलेला गाऊन परिधान केला होता. स्ट्रॅपलेस, गुडघ्याच्या खाली येणाऱ्या या पांढऱ्या ड्रेसवर आडव्या रेषांचे डिझाइन, पारदर्शक ट्यूल आणि कमरेजवळ फुलांची सजावट होती. त्यावर त्यांनी मोत्यांनी सजवलेला लांब व्हेल घेतला होता. केस मोकळे ठेवत त्यांना सॉफ्ट वेव्ह्सचा लूक दिला होता. लग्नानंतरच्या रिसेप्शनमध्ये जेमिमा यांनी प्लीटेड शोल्डर्स असलेला पांढरा मिनी ड्रेस परिधान केला. रिसेप्शनमध्ये ताज्या अंजीर आणि बेरीजने सजवलेला वेडिंग केकही होता.

लग्नाच्या तयारीत मदत करणाऱ्या स्टायलिस्ट मार्था वॉर्ड यांचेही जेमिमा यांनी आभार मानले. तसेच केट रॉथ्सचाइल्ड आणि ॲनाबेल रिव्हकिन यांचा आपल्या ‘ए टीम’चा भाग म्हणून उल्लेख केला. जेमिमा आणि कॅमेरॉन गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाची बातमी या आठवड्याच्या सुरुवातीला समोर आली होती. त्यानंतर जेमिमा यांनी स्वतः लग्नाचे फोटो शेअर करून या वृत्ताला दुजोरा दिला.

कोण आहेत कॅमेरॉन ओ’रेली?

कॅमेरॉन ओ’रेली हे दिवंगत आयरिश-ऑस्ट्रेलियन मीडिया व्यावसायिक सर अँथनी ओ’रेली यांचे पुत्र आहेत. त्यांनी वडिलांच्या मीडिया व्यवसायात काम केले होते. त्यानंतर त्यांनी बेयार्ड कॅपिटल नावाची प्रायव्हेट इक्विटी फर्म सुरू केली.