Chinese Spying Trump Musk Claim: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक प्रमुख उद्योगपतींनी अलिकडेच चीन दौरा केला. विविध करार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीकोणातून हा अतिशय महत्वाचा होता. पण, या दौऱ्यात चिनी गुप्तहेरांनी अमेरिकी शिष्टमंडळाची हेरगिरी केल्याचा आरोप जेनिफर झेंग या ब्लॉगरने केला आहे. साध्या वेशातील गुप्तहेरांनी अमेरिकी सरकारी शिष्टमंडळ आणि उद्योगपतींवर पाळत ठेवल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर केलेल्या अनेक पोस्ट्समधून झेंग यांनी चीनवर हेरगिरीचा आरोप केला आहे.
वेट्रेस स्पाय असल्याचा दावा
बीजिंगमधील एका शासकीय मेजवानीत स्पेसएक्सचे मालक अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मागे उभा असलेली माहिला वेटर ही चिनी लष्करातील एक उच्च पदावरील अधिकारी असल्याचा दावा जेनिफर झेंग यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून केला आहे. २०२३ मध्येही झेंग यांनी चीनवर हेरगिरीचा आरोप केला होता. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची प्रमुख भूमिका होती, असा आरोप झेंग यांनी केला होता. भारताची कोंडी करण्यासह भारत व पाश्चात्य देशांमध्ये दुही निर्माण करण्याचा चीनचा उद्देश होता, असा आरोप त्यांनी केला होता.
शाही मेजवानीतील फोटो, व्हिडीओ समोर
डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील उद्योगपती चीनमध्ये असताना त्यांच्या सन्मानार्थ चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शाही मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीतील दोन वेट्रेसचा फोटो झेंग यांनी शेअर केला आहे. वेट्रेसच्या वेशात दिसणाऱ्या महिलेचे लष्करी गणवेशातील फोटो देखील समोर आले असून, चिनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचा दावा झेंग यांनी केला आहे. नंतरच्या एका पोस्टमध्ये, झेंग यांनी मस्कच्या मागे उभी असलेली वेट्रेस मेजर चेंग चेंग होती असा दावा केला आहे. चेंग चेंग एक एलिट बटालियन कमांडर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
झेंग यांचे आरोप
चेंग चेंग यांच्याकडे यावेळी गन देखील होती, असा दावा झेंग यांनी केला आहे. दरम्यान, एक्सवरुन झेंग यांनी केलेल्या या दाव्यांवर चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. किंवा अमेरिकेकडूनही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. झेंग यांनी शेअर केलेला व्हिडीओ एआय असल्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले असून, व्हिडीओ खरा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ट्रम्प यांचा चीन दौरा
दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्या संघर्ष सुरु असताना ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याकडे जगाचे लक्ष लागले होते. चीनने देखील इराणकडे कधीच अण्वस्त्र असणार नाही यावर सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच, शस्त्रास्त्र पुरवठा न करण्याची ग्वाही देखील चीनने दिल्याची ट्रम्प म्हणाले.
