उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका तरुणीची तिच्याच प्रियकराने घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची भीषण घटना घडली आहे. चंचल रैकवार (१९) असे मृत तरुणीचे नाव असून, कुटुंबीयांनी नात्याला विरोध करून तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे आरोपी अत्यंत संतापला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार, आरोपी कमल रैकवार बुधवारी चंचलच्या घरात गेला आणि तिच्यावर गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाला. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
चार वर्षांपासून प्रेमसंबंध
चौकशीत कमलने चंचलसोबत सुमारे चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले होते. मात्र, चंचलच्या कुटुंबीयांना त्यांच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या नात्याला विरोध केला. त्यानंतर चंचलचे लग्न दुसरीकडे ठरल्याची माहिती कमलला मिळाली. यामुळे संतापून त्याने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हत्येनंतर पळून गेला
चंचलची हत्या केल्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपवण्याचा विचार कमलने केला होता, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, चंचलला रक्ताच्या अवस्थेत पाहून तो घाबरला आणि तेथून पळून गेला, असे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाच तासांत पोलिसांच्या चकमकीत जखमी
हत्येनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली. झाशी-शिवपुरी महामार्गाजवळ कमल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात कमलच्या पायाला गोळी लागली. यानंतर त्याला अटक करून गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्याकडून चंचलच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले.
हत्येच्या पाच तासांत अटक
सिटी एसपी प्रीती सिंह यांच्या माहितीनुसार, चंचलच्या कुटुंबीयांकडून गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी चार पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. हत्येनंतर सुमारे पाच तासांनी महामार्गावर झालेल्या गोळीबाराच्या चकमकीनंतर कमलला अटक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
