Jharkhand Air Ambulance Crash: झारखंडच्या रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) घडली. या विमान अपघाताच्या चौकशीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हे विमान ३९ वर्ष जुने होते. तसेच ६,६०० तासांचे उड्डाण केले होते. आगीत भाजलेल्या रुग्णाला पुढील उपचारांसाठी दिल्लीला नेले जात असताना सदर अपघात झाला.

या विमान अपघातात ४१ वर्षीय रुग्ण संजय कुमार आणि त्यांची पत्नी, डॉक्टर, दोन फ्लाइट अटेंडट आणि पायलट इन कमांड विवेक विकास भगत आणि को पायलट सवराजदीप सिंग यांचा मृत्यू झाला. पायलट विकास भगत यांना १,४०० तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. तर सवराजदीप सिंग यांना ४५० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीस्थित रेडबर्ड एअरवेजच्या माध्यमातून हे बीचक्राफ्ट सी ९० विमान चालवले जात होते. VT-AJV या नावाने त्याची नोंदणी होती. १९८७ साली विमानाची निर्मिती करण्यात आली होती. अपघाताच्या वेळी विमानाचा ६,६१० तासांचा एअरफ्रेम वेळ झाला होता.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, अपघातग्रस्त विमानात ब्लॅक बॉक्स नव्हता. यामुळे आता अपघाताचे कारण जाणून घेण्यास अडचण येऊ शकते.

तसेच खराब हवामान आणि वादळामुळे सदर अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र नेमके कारण डीजीसीए आणि एएआयबीच्या तपासानंतरच समोर येऊ शकेल. एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांनीही याच मार्गावर खराब हवामानाची तक्रार नोंदवली होती.

चौकशीतून कोणत्या बाबी समोर आल्या?

  • ब्लॅक बॉक्स मिळाला नाही – अपघातग्रस्त विमानात ब्लॅक बॉक्स आढळून आलेला नाही. त्यामुळे कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्ड आणि फ्लाइट डेटा रेकॉर्ड मिळवण्यात अडचण येऊ शकते. तपास अधिकाऱ्यांना एअर ट्राफिक कंट्रोल, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर तांत्रिक बाबींच्या विश्लेषणावर अवलंबून राहावे लागेल.
  • चार वर्ष विमानाचा वापर नाही. बीचक्राफ्ट सी ९० किंग एअर विमानाचे २०१८ ते २०२२ या काळात वापर झाला नव्हता.