रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी सोमवारी विधानसभेभोवती उभारलेले अडथळे तोडून विधानसभेच्या आवारात प्रवेश केला. परीक्षांतील गैरप्रकारांची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी आंदोलक विद्यार्थ्यांनी सोमवारी विधानसभेवर मोर्चाची घोषणा केली होती. त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सोमवारी १७वा दिवस होता.

जुन्या विधानसभा इमारतीपासून सकाळी १०.३० वाजता मोर्चा सुरू झाला. गेले आठ दिवस उपोषण करणारे ‘जेकेएलएम’चे नेते देवेंद्रनाथ माहतो हे रुग्णवाहिकेतून मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स, काटेरी तारा इत्यादींचा वापर करण्यात आला, पण आंदोलकांनी त्याला जुमानले नाही. आंदोलक मागे हटत नाहीत, हे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा फवारा, अश्रुधूर सोडला आणि लाठीमारही केला. यादरम्यान विद्यार्थी निदर्शक आणि पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

आंदोलक विधानसभा मार्गावरील जगन्नाथपूर मंदिराजवळील अखेरच्या बॅरिकेड्सजवळ पोहोचल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. पीयूष कुमार सोनी या आंदोलकाने सांगितले की, ‘‘पोलिसांनी अमानुष  लाठीमार केला. आम्ही शांततेत निदर्शने करत होतो. ते आम्हाला शारीरिकदृष्ट्या जखमी करू शकतात, पण आमचे विचार संपवू शकत नाहीत. अनेक विद्यार्थिनीही जखमी झाल्या. पोलिसांनी आमचे डोके, हात, चेहरा सगळीकडे मारले.’’ तर हजारीबागहून आलेल्या विक्रम कुमार या आंदोलकाने आपल्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगितले.

हेमंत सोरेन सरकार आमच्याशी जे वागत आहे ते चांगले नाही. आम्ही शांततेने निदर्शने करत होतो, मग  पोलिसांनी आम्हाला लाठीमार का केला, असा प्रश्न विक्रम कुमारने केला. लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष शशांक राज यांनी दिली. राजकीय महत्त्वकांक्षेपोटी भाजपने या आंदोलनात शिरकाव केल्याचा आरोप झारखंडचे मंत्री सुदीव्या कुमार यांनी केला. विधानसभेतही त्यांनी याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपवर टीका केली.

भाजपचा आंदोलकांना पाठिंबा

नवी दिल्ली: झारखंडमधील आंदोलनाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातून राजकीय लाभाचा प्रयत्न करणारे आता झारखंडबाबत शांत आहेत असा टोला भाजप नेते तरुण चुग यांनी लगावला. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे वेळ नाही अशी टीका त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.

‘भाजप सदस्यांच्या गैरहजेरीवर सवाल’

झारखंड विधानसभेत सोमवारी भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते. विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महातो यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संसदीय परंपरेसाठी हे चांगले नाही असे त्यांनी नमूद केले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा अध्यक्षांनी भाजप सदस्यांची नावे पुकारली तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे मत व्यक्त केले. विद्यार्थी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सदनात उपस्थित राहता आले नाही असे स्पष्टीकरण चंद्रेश्वर प्रसाद सिंह यांनी दिले.

‘आंदोलकांविरोधात बळाचा वापर अयोग्य’

आंदोलकांविरोधात बळाचा वापर चुकीचा असल्याचे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. झारखंड सरकारने निदर्शकांशी चर्चा करून तातडीने त्यांचा प्रश्न सोडवावा अशी सूचना राहुल यांनी केली. झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे.

आयोगाच्या माजी अध्यक्षाला अटक

’भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेप्रकरणी झारखंड सीआयडीने जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना अटक केली, अशी माहिती राज्याच्या तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

’भारतीय प्रशासन सेवेतील १९८८ च्या तुकडीचे अधिकारी असलेले खियांगते राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांची झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी गेल्या वर्षी फेब्रुवारीत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २२ जुलै रोजी राजीनामा दिला होता. २८ जुलैपासून चार वेळा त्यांची चौकशी करण्यात आली.

‘ईडी’कडून चौकशी : झारखंडमधील भरती परीक्षांच्या आयोजनातील कथित अनियमिततेबाबत सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.  सीआयडीने  दाखल केलेला गुन्हा तसेच इतर काही तक्रारींची दखल घेऊन, ही चौकशी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय फायद्यासाठी भाजप आंदोलकांची दिशाभूल करत आहे. परीक्षा पद्धत  अधिक पारदर्शक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – हेमंत सोरेन, मुख्यमंत्री, झारखंड