“आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार”; काँग्रेस आमदाराचं विधान

कंगना राणौतवर केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केलेत, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गेल्या महिन्यात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच चर्चेत राहिले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. या प्रकरणावरून खुद्द अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी देखील एखाद्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीला अशी वक्तव्ये करणं शोभत नाही, असं म्हणत सुनावलं होतं. दरम्यान, आता एका काँग्रेस आमदाराने आपल्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणौतच्या गालासारखे बनवणार असल्याचं वक्तव्य केलंय.

झारखंडचे काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी यांनी आपल्या झारखंडमधील जामतारा या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणौतच्या गालापेक्षा अधिक चांगले होतील, असे वक्तव्य करून वादात सापडले आहेत. त्यांनी शुक्रवारी पोस्ट केलेल्या स्वत: तयार केलेल्या व्हिडीओमध्ये, डॉ इरफान अन्सारी म्हणतात की, “जामतारा येथे जागतिक दर्जाच्या १४ रस्त्यांचे बांधकाम लवकरच सुरू होईल. हे रस्ते अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त चांगले असतील, याची मी खात्री देतो.”

डॉ. इरफान अन्सारी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत होते. तेव्हा त्यांनी लोकांनी करोनापासून बचावासाठी जास्त काळ फेस मास्क घालू नये, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं वक्तव्य केलं होतं. स्वतः डॉक्टर असल्याचं म्हणत मास्कचा जास्त आणि दीर्घकाळ वापर केल्याने कार्बन डायऑक्साइड इनहेलेशन होते, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, इरफान अन्सारी यांनी कंगना राणौतवर केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jharkhand congress mla irfan ansari promises to build roads smoother than kangana ranauts cheeks hrc