jharkhand human elephant conflic : झारखंडमध्ये मानव-हत्ती संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. या संघर्षात रामगड आणि सिंहभूम या जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ दिवसांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रामगड येथे ग्रामस्थांनी धनुष्य बाणाने हल्ला केल्याने एक हत्ती हिंसक बनला. तर दुसरीकडे पश्चिम सिंहभूममध्ये १ जानेवारीपासून बिथरलेल्या हत्तीने १६ लोकांचा जीव घेतला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना विभागीय वन अधिकारी (DFO)आदित्य नारायण म्हणाले की, “हत्ती हिंसक झाल्याचे दिसून येत आहे आणि त्याला लवकरात लवकर औषध देऊन बेशुद्ध करणे हेच आमचे सध्याचे ध्येय आहे. तो सध्या मस्त अवस्थेत असल्याबद्दल आम्हाला खात्री आहे, ज्यामुळे त्याचा वाढलेला आक्रमकपण दिसून येत आहे. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, राज्य वन विभागातील अधिकाऱ्यांसह पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि ओडिशा येथील विशेष पथकांना तैनाक करण्यात आले आहे. “आम्ही वनतारा रेस्क्यू अँज रिहॅबिलिटेशन सेंटर (VRRC) आणि वाइल्डलाइफ एसओएसकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणीही केली आहे,” असेही त्यांनी सांगितले.
भीषण बाब म्हणजे, मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री, हत्तीने केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हत्तीने झोपड्यांवर हल्ला केल्यानंतर हा प्रकार घडला.
वन विभागाने हत्तींना सुरक्षित ठिकाणी वळवणे आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी ८० कर्मचारी तैनात केले आहेत, ज्यामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्सचा देखील समावेश आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम सिहभूममध्ये अनेक ठिकाणी भूमिगत IED स्फोटके असल्याने सुरक्षिततेच्या चिंतांमुले या मोहिमेत मोठा अडथळा येत आहे.
वाइल्डलाइफ इंस्टिट्युट ऑफ इंडिया (WII)ने केलेल्या ताज्या अभ्यासात मानव-हत्ती यांच्यातील संघर्षात झारखंडमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली आहेत. राज्य स्थापन झाल्यापासून १३०० हून अधिक लोकांचा हत्तींशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाल्याचे या अभ्यासा सांगण्यात आले आहे.
