पीटीआय, रांची
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन रविवारी पक्ष सोडण्याचे संकेत दिले. झारखंड विधानसभा निवडणुकीपर्यंत माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे त्यांनी सांगितले. ते दिल्लीला रवाना झाले असून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री असताना अपमानाला सामोरे जावे लागले. त्यातूनच पर्यायी मार्ग शोधावा लागल्याचे सोरेन यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर सांगितले.
चंपई सोरेन कोलकाता येथून रविवारी सायंकाळी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले. माझा मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अपमान करण्यात आला होता. त्यामुळे आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगून त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले. मुख्यमंत्री पदी असताना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचीही परवानगी नव्हती. त्याशिवाय अचानक राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे पर्यायी मार्ग शोधण्यास प्रवृत्त करण्यात आले, असे चंपई सोरेन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणून कटू अवमान अनुभवला आहे. ३ जुलै रोजी पक्षनेतृत्वाने नकळत त्यांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले. जेव्हा मी रद्द करण्याचे कारण विचारले, तेव्हा मला सांगण्यात आले की पक्षाच्या आमदारांची बैठक आहे आणि तोपर्यंत मी कोणत्याही सरकारी कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाही. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम दुसऱ्या व्यक्तीने रद्द करण्यापेक्षा लोकशाहीत अपमानास्पद काही असू शकते का, असे चंपई म्हणाले.
भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण- हेमंत सोरेन
चंपई सोरेन भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात, अशा अटकळीदरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी भाजपवर ‘झामुमो’च्या आमदारांची शिकार केल्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने गुजरात, आसाम आणि महाराष्ट्रातील लोकांना आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांमध्ये विष पसरवण्यासाठी आणले आणि त्यांना एकमेकांशी लढायला लावले, असा आरोप त्यांनी केला.
‘इंडिया आघाडीला कोणतीच अडचण नाही’
चंपई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी इंडिया आघाडीला झारखंडमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे काँग्रेस नेते अजॉय कुमार यांनी सांगितले. चंपाई जर भाजपमध्ये गेले तर भाजप नेत्यांमध्येच तेढ निर्माण होईल. राज्यातील सत्ताधारी आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन हेच इंडिया गटाचा चेहरा असतील, असे कुमार म्हणाले. भाजपमध्ये चंपई गेले तर बाबुलाल मरांडी अर्जुन, मुंडा कुठे जातील, असा सवाल त्यांनी विचारला.