Jharkhand Panipuri food poisoning death incident: पाणीपुरी हा अनेकांचा आवडता खाद्यपदार्थ. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यांभोवती किंवा अगदी रीतसर दुकानात विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीसाठी अनेक ठिकाणी मोठ्या रांगादेखील पाहायला मिळतात. पण याचप्रमाणे काही ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कोणतीही काळजी कशी घेतली जात नाही, पाणीपुरीसाठी अस्वच्छ पाणी कसं वापरलं जातं यासारखे व्हिडीओदेखील वेळोवेळी व्हायरल होत असतात. असाच काहीसा प्रकार झारखंडच्या गिरिदी जिल्ह्यात समोर आला असून पाणीपुरी खाल्ल्यामुळे दोन गावांमधल्या ६० जणांना विषबाधा झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या आजारात एका चिमुकल्याचा मृत्यूदेखील झाला आहे.

दोन गावांमध्ये एकूण ६० जण आजारी

गिरीदी जिल्ह्यातल्या बाजतो गावचे सरपंच जितेंद्र वर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, त्या गावातील जवळपास ४० ते ५० जणांना रविवारी हगवणीची लक्षणं दिसून आली. यापैकी एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारांअभावी मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजूच्या पालमो गावातूनदेखील अशाच लक्षणांसाठी २० जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या लक्षणांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

एकाच विक्रेत्याकडून खाल्ली होती पाणीपुरी!

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर दोन्ही गावातील गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून एका पाणीपुरी विक्रेत्यावर संशय व्यक्त केला जात आहे. आजारी पडलेल्या सर्व गावकऱ्यांनी त्याच पाणीपुरी विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ली होती, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. हा पाणीपुरी विक्रेता पालमो गावातला आहे. यासंदर्भात जितेंद्र वर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार, सदर पाणीपुरी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण त्याच दिवशी रात्री त्याला सोडूनही देण्यात आलं.

रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेचा बळी

या प्रकारामुळे मृत्यू पावलेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूसाठी रुग्णालयातील अनास्थेला दोषी धरलं आहे. “माझा मुलगा आजारी पडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी आम्ही दुपारी दीडच्या सुमारास रुग्णवाहिकेसाठी फोन करू लागलो. पण बराच काळ कुणीच प्रतिसाद दिला नाही. नंतर रुग्णवाहिका जवळपास ३ वाजता आली. रुग्णालयात पोहोचल्यानंतरदेखील कोणतेही तातडीचे उपचार मुलाला देण्यात आले नाहीत. जवळपास दीड तास त्याला कोणत्याही डॉक्टर वा नर्सनं तपासलंदेखील नाही. माझ्या मुलाचा माझ्या मांडीवरच जीव गेला”, अशा भावनिक शब्दांत मुलाचे वडील राम किशोर प्रसाद वर्मा यांनी आपला संताप व्यक्त केला.

पाणीपुरी विक्रेत्याविरोधात तक्रार करणार

दरम्यान, आपण पाणीपुरी विक्रेत्याविरोधात तक्रार करणार असल्याचं राम किशोर प्रसाद वर्मा यांनी सांगितलं. “जर माझ्या मुलाला वेळीच चांगले उपचार मिळाले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. मी रुग्णालयात त्यावेळी उपस्थित डॉक्टर आणि नर्सविरोधातही तक्रार करणार आहे”, असं ते म्हणाले.

सदर रुग्णालयात याच लक्षणांसाठी इतर रुग्णांवर उपचार केले जात असून अनेकांना सलाईनदेखील लावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत इंडियन एक्स्प्रेसनं सिव्हिल सर्जनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.