Jharkhand Rajya Sabha election results: झारखंडमधील राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस-वोटिंगमुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. राज्यसभेच्या दोन जागांपैकी एका जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार आणि माजी मंत्री बैद्यनाथ राम विजयी झाले असून, दुसरी जागा एनडीए-समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांनी पटकावली. नथवाणी यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा यांचा पराभव केला. एनडीए-समर्थित नथवाणी यांना क्रॉस-वोटिंगचा फायदा झाला. हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

क्रॉस-वोटिंगमुळे नथवाणी विजयी

राष्ट्रीय जनता दल आणि सीपीआय (एम-एल) लिबरेशनच्या आमदारांनी एनडीए-समर्थित उमेदवार नथवाणी यांच्या बाजूने मतदान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ८१ आमदार असलेल्या झारखंड विधानसभेत विजयासाठी उमेदवाराला २८ मते आवश्यक होती. जेएमएम-नेतृत्वाखालील आघाडीकडे एकूण ५६ आमदार असून, क्रॉस-वोटिंग झाले नसते तर त्यांचे दोन्ही उमेदवार सहज विजयी झाले असते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बैद्यनाथ राम यांना ३० मते मिळाली, तर नथवाणी यांनाही ३० मते मिळाली; मात्र यातील दोन मते अवैध ठरवण्यात आली. दुसरीकडे, काँग्रेसच्या झा यांना केवळ २१ मते मिळवता आली, तर त्यांचे एक मत अवैध घोषित करण्यात आले.

काँग्रेसचे मित्रपक्षांवर आरोप

आरजेडीचे चार आमदार आणि सीपीआय (एम-एल) लिबरेशनच्या दोन आमदारांनी झा यांच्या बाजूने मतदान केले नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे १६ आमदार, जेएमएमच्या चार आमदारांची मते झा यांना मिळाली होती. आरजेडी आणि सीपीआय (एम-एल) लिबरेशनने विश्वासघात आणि भाजपवर घोडेबाजार करून हा निकाल घडवून आणल्याचा आरोप, झारखंड काँग्रेसचे प्रभारी के. राजू यांनी केला आहे. सीपीआय (एम-एल) लिबरेशनचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य हा आरोप फेटाळून लावला. सीपीआय (एम-एल) चे आमदार अरुप चटर्जी यांनी देखील या आरोपांचे खंडन केले.

आरोपांचे खंडन

“काँग्रेसकडे २० मते असल्याचा दावा केला जात आहे, तर केवळ आरजेडी किंवा सीपीआय (एम-एल) ची मतेच याला जबाबदार होती असे कसे गृहीत धरले जाऊ शकते? हा फरक दुसऱ्यामुळे झाला नसेल कशावरून?”, असा सवाल चटर्जी यांनी उपस्थित केला. तर, “इंडिया आघाडीने दोनपैकी एक जिंकली असून, आमची आघाडी मजबूत आहे”, असे आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुमार मेहता म्हणाले.

नथवाणी यांनी मानले आभार

दरम्यान, या विजयामुळे राज्यसभेवर चौथ्यांदा निवडून आल्यानंतर नथवाणी यांनी, “हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावूक आहे, कारण झारखंडमधून ही माझी तिसरी टर्म असेल. इथूनच २००८ मध्ये माझा संसदीय प्रवास सुरू झाला होता. कर्मभूमीत पुन्हा परतणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे,” अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. नथवाणी मूळ गुजरातचे रहिवासी असून रिलायन्सचे कार्यकारी अधिकारी आहेत, २००८ ते २०२० दरम्यान त्यांनी सलग दोन वेळा अपक्ष म्हणून राज्यसभेत झारखंडचे प्रतिनिधित्व केले आहे.