Ranchi Police News: देशभरात हाणामारीच्या अनेक घटना समोर येतात. त्यानंतर पोलीस संबंधितांवर कारवाई देखील करतात. मात्र, आता पोलीस ठाण्यातच हाणामारीचा प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या रांचीमधून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडीओ हा रांचीच्या लालपूर पोलीस ठाण्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओत एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

नेमकी घटना काय घडली?

रांचीमधील लालपूर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यात आरोपीच पोलिसांना मारहाण करताना दिसून आले आहेत. पोलीस ठाण्यातच हाणामारीचा प्रकार घडल्यामुळे पोलिसांचा धाक कमी झालाय का? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. घडलं असं की, ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास पोलीस रात्रीच्या गस्तीवर होते. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची एक कार लालपूर चौकाच्या दिशेने भरधाव वेगात आणि बेदरकारपणे जात असल्याचं पोलिसांना दिसलं. त्यानंतर पोलिसांनी ती कार थांबवली आणि चेक केली.

हेही वाचा : Uttar Pradesh Kushinagar : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं

त्यानंतर पोलिसांनी कार चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यानंतर कार चालकाने पोलिसांशी अर्वाच्य भाषा वापरली आणि शिवीगाळ केली. तसेच आपण एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर तुमची वर्दी आपण दोन मिनिटांत काढू शकतो, अशी धमकीही दिली. यानंतर पोलिसांनी कारमधील दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणलं. पोलीस ठाण्यात आणल्यामुळे या दोन्ही तरुणांनी पोलीस ठाण्यातच वाद घालत मोठा गोंधळ केला. तसेच तेथील काही कागदपत्रेही फाडली.

यानंतर पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही तरुणांनी पोलिसांनाच मारहाण केली. यामध्ये एका तरुणाने एका पोलीस कर्मचाऱ्याला भिंतीवर जोरात लोटलं. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. यानंतर या दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली. रवी रंजन लाक्रा आणि विनोद लाक्रा अशी मारहाण करणाऱ्या या दोन तरुणांची नावं आहेत. शासकीय कामात अडथळा, पोलिसांना मारहाण करणं, शिवीगाळ करणं यासह विविध कलमाखाली लालपूर पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ते दोन्ही तरुण कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसल्याची माहिती समोर आली. तसेच आपल्या वाहनात राजकीय पक्षाचे बनावट फलक लावून प्रवास करत असल्याचं समोर आलं.