पीटीआय, रांची
झारखंडमधील भरती परीक्षांमधील अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आंदोलकांनी झारखंड सरकारला अंतिम इशारा दिला असून २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. झारखंडमधील सर्व २४ जिल्ह्यांमध्ये सोरेन, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सत्ताधारी आघाडीशी संबंधित इतर नेत्यांचे पुतळे जाळण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली.

झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा रविवारी २३ वा दिवस होता. झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आणि ठोस कारवाई करण्यात अपयश ठरल्याचा आरोप करत आंदोलकांनी आंदोलनाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारला आता अंतिम इशारा देण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल, असे आंदोलकांनी पहिल्यांदा अधिकृतपणे जाहीर केले.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. १० ऑगस्ट रोजी झारखंड विधानसभेकडे काढण्यात आलेल्या मोर्चापासून हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे; त्या दिवशी आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला होता आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रुधूर व लाठीचार्जचा वापर केला होता. आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या ‘जेपीएससी- जेएसएससी रिफॉर्म मंच’चे प्रवक्ते पीयूष सिंह यांनी सांगितले की, ‘‘विद्यार्थ्यांच्या चार प्रमुख मागण्या आहेत. मात्र राज्य सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढू. आंदोलन तीव्र झाल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल.’’

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. विद्यार्थी या अनियमिततेशी सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. ही मागणी मान्य करण्यास सरकारला भीती का वाटत आहे? जर राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तर ते तरुणांना आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडत आहेत. – बाबूलाल मरांडी, विरोधी पक्षनेते, झारखंड विधानसभा

‘आता गांधी नाही, भगतसिंग बनू’

‘आंदोलक आता आपल्या आंदोलनाची दिशा बदलतील. आंदोलनाची कार्यपद्धती बदलण्याची वेळ आली आहे. गांधीवादी आंदोलन आता संपले आहे. आता आम्ही भगतसिंग बनू. जरी आम्हाला गोळी खावी लागली, तरी आम्ही ती छातीवर झेलू’, असे विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सांगितले. ‘जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलनाच्या पुढील टप्प्यात सरकारवरचा दबाव अधिक तीव्र करण्यावर भर दिला जाईल’, असेही या विद्यार्थी नेत्याने सांगितले.